विहीरीने केलं शेतकऱ्याला श्रीमंत

जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावातल्या एका विहिरीच्या खोदकामात पांढराशुभ्र हिरेसदृश्य खडक सापडला. हे मौल्यवान दगड विकताना शेतकरी पकडला गेल्यानं हा प्रकार उघडकीस आला.

Updated: Mar 8, 2012, 03:15 PM IST

विकास भदाणे, www.24taas.com, जळगाव

 

जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावातल्या एका विहिरीच्या खोदकामात पांढराशुभ्र हिरेसदृश्य खडक सापडला. हे मौल्यवान दगड विकताना शेतकरी पकडला गेल्यानं हा प्रकार उघडकीस आला. विहिरीत सापडलेले हे दगड नक्की काय आहेत याचा शोध घेतला जात आहे.

 

विहिरीच्या खोदकामात सापडलेले हिरेसदृश्य पांढरे शुभ्र स्फटिकासारखे दगड जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. पाचोरा तालुक्यातल्या वाकडी शिवारात करीम कहाकर या शेतकऱ्याच्या शेतात विहिरीचं खोदकाम सुरु होतं. जमीन वीस फुट खोदल्यानंतर पांढऱ्या आणि पारदर्शी दगडांचा साठा लागला. शेतकऱ्याने या मौल्यवान दगडाची चोरुन विक्री सुरु केली. चोरट्या मार्गानं सुरु असलेली विक्री फारकाळ लपून राहिली नाही. या दगडाची चोरटी वाहतूक सुरु असताना शेतकरी पकडला गेला. चौकशीत आत्तापर्यंत हिरेसदृश्य दगड अनेक ठिकाणी विकल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी विहिरीचा ताबा घेतला असून शेतकऱ्याने दगड कुणाकुणाला विकले आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत.

 

विहिरीत साप़डलेला मौल्यवान दगड पाहाण्य़ासाठी परिसरातील लोकांची एकच गर्दी झाली आहे. हा दग़ड नेमका कोणत्या प्रकारचा आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी केली जात आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांकडून या दगडांची तपासणी केल्यानंतरच खरा प्रकार स्पष्ट होणार आहे. मात्र या दगडांनी शेतकऱ्याला मात्र लाखो रुपयांनी मालामाल केल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.