झी २४ तास वेब टीम, पुणे
पुण्यातील अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर होते, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, दगडूशेठ गणपती मंदिराची सुरक्षाव्यवस्थेची काळजी घेऊन मजबूत करण्यात आलेली आहे, असा दावा पोलीस आणि विश्वास्तांनी केला आहे.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट झाला त्या सायंकाळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरातही बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महम्मद कातील सिद्दीकी या आरोपीने दिली आहे.
मंदिर परिसरात असलेल्या एका फुलवाल्याने सुरक्षाविषयक खबरदारी घेत स्फोटकांनी भरलेली ती बॅग ठेवू न दिल्याने त्याचा कट उधळला गेला आणि एक मोठा अनर्थ टळला. दिल्ली पोलिसांनी नुकतीच इंडियन मुजाहिदीनच्या सहा संशयित अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यात अटक करण्यात आलेल्या सिद्दीकी याने 'एटीएस'ला ही माहिती दिली असल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब ठेवणारा संशयित अतिरेकी यासीन भटकळ उर्फ अहमद सिद्दीबाप्पा उर्फ हकीम इम्रान यानेच दगडूशेठ गणपती मंदिर लक्ष्य करण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्याने या परिसराची टेहाळणीही केली होती. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस आधी यासीन आणि सिद्दीकी यांनी दगडूशेठ मंदिरात रंगीत तालीम केली होती. त्या दिवशी सिद्दीकी याच्याकडे कपड्याने भरलेली बॅग देण्यात आली होती. ही बॅग घेऊन सिद्दीकी मंदिर परिसरातील एका फुलवाल्याकडे गेला. फुलवाल्याकडे बॅग ठेऊन तो दर्शनासाठी गेला होता. दर्शन झाल्यानंतर सिद्दीकी याने परत फुलवाल्याकडे येऊन ताटाचे ३० रुपये दिले आणि बॅग घेऊन परत गेला. हा सर्व प्रकार यासीन काही अंतरावर उभा राहून पाहत होता. फुलवाल्याकडे बॅग ठेवण्याचा प्लॅन यशस्वी होईल, याची खात्री झाल्यानंतर यासीन बिनधास्त झाला होता.
मात्र, त्याच सुमारास डेव्हिड कोलोमन हेडली प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठला दहशतवाद्यांकडून धोका असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली होती. कोणत्याही भक्ताचे सामान ठेवून न घेण्याच्या सूचना फुलवाल्यांना देण्यात आल्या होत्या. संबंधित फुलवाल्याने त्याचेच तंतोतंत पालन केले. सिद्दीकी बॅग ठेवण्यासाठी गेला त्यावेळी त्या फुलवाल्याने त्यासाठी असमर्थता दर्शवली. त्याच्या जागरूकपणामुळेच दगडूशेठ मंदिराबाहेरील बॉम्बस्फोट टळू शकला, अशी माहिती पुढे आली.
हातामध्ये स्फोटकांची बॅग असल्याने भयभीत झालेल्या सिद्दीकीने मग तेथून पळ काढला आणि पुणे स्टेशनवरून बस पकडून मुंबई गाठली. सिद्दीकी याने थेट वरळी समुदकिनारी धाव घेतली. तेथे त्याने बॉम्ब निकामी केला आणि समुद्रात फेकून दिला. त्यानंतर त्याने दिल्लीला पळ काढला, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, दगडूशेठ गणपती मंदिराची सुरक्षाव्यवस्था सर्वतोपरी काळजी घेऊन मजबूत करण्यात आलेली आहे, असा दावा पोलीस आणि विश्वसस्तांनी केला आहे. मात्र, येथे घातपाताची योजना आखल्यासंबंधी दिल्लीत अटक केलेल्या आरोपींनी कबुली दिल्याची अधिकृत माहिती पोलिसांकडे आली नसल्याचे सांगण्यात आले.