www.24taas.com, पिंपरी - चिंचवड
जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीत बेबनाव निर्माण झाला असतानाच पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीला काँग्रेसनं साथ दिली. काँग्रेसच्या मदतीनं राष्ट्रवादीचे उमेदवार बाबुराव चांदेरे हे स्थायी समिती अध्यक्षपदी निवडून आले.
अध्यक्ष निवडून येण्यासाठी चांदेरे यांना तीन मतांची गरज होती. काँग्रेसनं चांदेरे यांच्या पारड्यात ही तीनही मतं टाकली. तर मनसेच्या उमेदवारानं उमेदवारीच मागं घेतली. त्यामुळं चांदेरे यांचा विजय सोपा झाला. राज्यात अनेक जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीनं काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला होता.
त्यामुळं पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस याची परतफेड करील का याची उत्सुकता होती. काँग्रेसनं मात्र राजकीय शहाणपण दाखवत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळं पुणे महापालिकेत तरी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सुखानं संसार करतील अशी चिन्ह दिसू लागली आहेत.