उद्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला दोन वर्ष पूर्ण

पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला उद्या दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही या प्रकरणाचा तपास अर्धवट अवस्थेतच आहे. या प्रकरणातील केवळ एका आरोपीला आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. म्हणूनच बॉम्बस्फोटाच्या घटनेतून पुणेकर सावरले असले तरी दहशतीचं सावट कायम आहे.

Updated: Feb 12, 2012, 07:44 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला उद्या दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही या प्रकरणाचा तपास अर्धवट अवस्थेतच आहे. या प्रकरणातील केवळ एका आरोपीला आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. म्हणूनच बॉम्बस्फोटाच्या घटनेतून पुणेकर सावरले असले तरी दहशतीचं सावट कायम आहे.

उध्वस्त झालेल्या जर्मन बेकरीचं अर्धवट अवस्थेतील नुतनीकरण वगळता याठिकाणी सारं काही सुरळीत सुरू आहे. पण म्हणून या घटनेच्या जखमा पुणेकरांच्या स्मरणातून पुसल्या गेल्या असं मात्र अजिबात नाही. १३ फेब्रुवारी २०१० च्या त्या संध्याकाळी  घडलेल्या बॉम्बस्फोटात १७ निष्पापांनी जीव गमवाला होता तर ६० हून अधिक जण जखमी झाले होते. या दुर्देवी घटनेला दोन वर्ष पूर्ण होताना नवीन कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनची स्थापना आणि पुणेकरांमध्ये निर्माण झालेली सतर्कतेची भावना याचाच काय तो यातून धडा घेतला गेला.

बाकी या प्रकरणाचा म्हणावा तसा तपास फारसा पुढे सरकलेला नाही. इंडियन मुजाहिद्दीननं हा बॉम्बस्फोट घडवल्याचं स्पष्ट झालं. मात्र, हिनायत बेग या एकाच आरोपीला एटीएसनं अटक केली. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी एकूण ७ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हिनायत वगळता इतर आरोपी फरार आहेत. इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या रियाज भटकळचाही त्यात समावेश आहे. देशातील राष्ट्रीय तसंच राज्य पातळीवर विविध यंत्रणा एकाचवेळी या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, तपास अजूनही मागच्या पानावरून पुढे सुरूच आहे.