कागल तालुक्यातील गणपतराव गाताडे गतिमंद विद्यालयातील दोन सख्खे भाऊ गायब होण्याची घटना घडली आहे. काळजीवाहकांची नजर चुकवून त्यांनी विद्यालयातून पळ काढला. रविवारी हरवलेली मुलं अद्याप न सापडल्यानं सर्वजण काळजीत आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर ही मुलं शाळेत परतली होती. मात्र त्यांच्या अचानक गायब होण्यानं संस्थाचालकांचे धाबे चांगलेत दणाणले.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील गणपतराव गाताडे गतिमंद विद्यालयातून मुन्नवर अलाउद्दीन आतार आणि त्याचा भाऊ इरशाद आतार हे दोघेजण गायब झाले. दिवाळीच्या सुट्टीनंतर ही मुलं शाळेत परतली खरी मात्र मन रमत नसल्यानं मोठा भाऊ इरशादनं लहान भाऊ मुन्नर याला घेऊन तिथून पळ काढला. सकाळी मुलांना आघोळ घातली जाते. त्यावेळी काळजीवाहक कामात असतांनाच या दोघा भावांनी तिथून काढता पाय घेतला.
या शाळेत पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचं संस्थाचालकांचं म्हणणं आहे. शाळेच्या इमारतीला कंपाऊंड नसल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगून संस्थाचालकांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.वास्तविक गतिमंद मुलांची योग्य ती काळजी घेणं ही या शाळेची जबाबदारी आहे. व्यवस्थापनाची एक चुकसुद्धा किती महागात पडू शकते याचं उदाहरण यानिमित्तानं समोर आलं. आता या गायब झालेल्या मुलांचा शोध घेण्याबरोबर इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडू नये यासाठी शाळेनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.