निवडणुकीत 'अण्णा' !

कोणत्याही उमेदवारानं निवडणूक प्रचारात आपलं नाव वापरू नये अशी तंबी अण्णा हजारेंनी दिली तरी पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडेतल्या भाजपच्या एका उमेदवारानं नगरपरिषद निवडणुकीत अण्णांचं नाव आणि अण्णांसोबतचा फोटोही वापरलाय.

Updated: Dec 11, 2011, 03:51 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

कोणत्याही उमेदवारानं निवडणूक प्रचारात आपलं नाव वापरू नये अशी तंबी अण्णा हजारेंनी दिली असली तरी अनेक उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्षच केलंय. पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडेतल्या भाजपच्या एका उमेदवारानं नगरपरिषद निवडणुकीत नुसतंच अण्णांचं नाव वापरलं नाही तर अण्णांसोबतचा फोटोही वापरलाय.

 

तळेगाव दाभाडेतील भाजपचे उमेदवार सुनील शेळके हे अण्णांच्या नावाबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या फोटोचा वापर करून आपला निवडणूक प्रचार करत आहेत. राळेगणचे सरपंच जयसिंग मापारी यांच्या परवानगीनेच फोटो प्रसिद्ध केल्याचं सुनील शेळके यांचं म्हणणं आहे. तर निवडणूक प्रचाराची जबाबदारी असलेले भाजप आमदार बाळा भेगडे यांनी माफी मागत प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केलाय.

 

दुसरीकडे भाजपाविरोधात लढणाऱ्या तळेगाव विकास समितीनं यावर जोरदार टीका केलीय. आता 'पार्टी विथ डिफ्रंस' असणाऱ्या भाजपच्या उमेदवारानं अण्णांचं नाव वापरल्यानं अण्णा त्याच्यावर कारवाई करणार का ? हा खरा प्रश्न आहे.