पवना जलाशयात ४०-५० कासवांचा मृत्यू

पुण्यात पवना धरण जलाशयामध्ये तब्बल 40 ते 50 कासवांचा एकाच वेळी मृत्यू झालाय. ही घटना घडूनही संबंधित खात्याचा एकही अधिकारी चार दिवस घटनास्थळी फिरकला नाही.

Updated: Jul 27, 2012, 05:56 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात पवना धरण जलाशयामध्ये तब्बल 40 ते 50 कासवांचा एकाच वेळी मृत्यू झालाय. ही घटना घडूनही संबंधित खात्याचा एकही अधिकारी चार दिवस घटनास्थळी फिरकला नाही. जैवविविधता जपण्यासाठी आपण किती उदासीन आहोत, हे या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झालंय.

 

पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणाच्या जलाशयामध्ये 40 ते 50 कासवे मृतावस्थेमध्‍ये सापडली आहेत. ग्रामस्थांनी तातडीनं यासंदर्भातली माहिती पाटबंधारे खात्याला कळवली. मात्र पाटबंधारे खात्याचा एकही कर्मचारी या ठिकाणी पोहोचला नाही. तीन दिवस उलटल्यानंतर वनखातं आणि पाटबंधारे खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तिथे फक्त दोनच कासवे आढळली. इतर कासवं धरणाच्या पाण्यात वाढ झाल्यानं वाहून गेल्याचा संशय आहे. कासवांचा नैसर्गिक कारणामुळे किंवा पाणी गढूळ झाल्यानं मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

कासवांचा मृत्यू मच्छिमारांमुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. जलाशयामध्ये मासेमारी करताना विशिष्ट प्रकारची पावडर टाकली जाते. त्यामुळेच कासवांचा मृत्यू झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मुळातच जल प्रदूषणामुळे अनेक जलचरांचं अस्तित्वच धोक्यात आलंय. त्यात पन्नास कासवांचा असा एकाचवेळी मृत्यू होणं ही निश्चितच धोक्याची घंटा आहे.