www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिपरी-चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधलेली घरे लाभार्थींना मिळत नाहीएत. त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून लाभार्थी संतापलेत.
पिंपरी-चिंचवडच्या सेक्टर २२ मधली ही घरं पाहिल्यावर ही घरं पडून का आहेत असा प्रश्न पडतो. महापालिकेनं झोपडपपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून ही घरं बांधलीत. जवळपास 13 हजार घरांची योजना असताना त्यातली तीन हजार घरे तयार आहेत.
ही घरं संरक्षण विभागाच्या हद्दीत येत असल्याच्या आरोपावरून शिवसेना नगरसेविक सीमा सावळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. न्यायालयानं ही घरं हस्तांतरीत करायला परवानगी नाकारली. शिवसेना नगरसेवक जनहीताच्या आड येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. सावळे यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत.
या प्रकारानं लाभार्थी संतापलेत. राजकारण्यांच्या वादात आम्हाला शिक्षा कशाला असा त्यांचा सवाल आहे. जनहीताची कामं शिवसेनेला नको आहेत असं चित्र उभं करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झालीय. शिवसेनेलाही त्याला उत्तर देता आलेलं नाही.