www.24taas.com, पुणे
पुणे बॉम्बस्फोटामागे कोणती संघटना आहे याचा अजून उलगडा झालेला नसला तरी यामागे इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवला आहे. यापूर्वी देशात अनेक ठिकाणी या संघटनेनं स्फोट करताना वापरलेली मोडस ऑपरेंडी पुणे बॉम्बस्फोटांशी जुळत असल्याचं तपासात आढळून आल्याचं सांगण्यात येतंय. स्फोटांमध्ये वापरण्यात आलेले अमोनिअम नायट्रेट, स्फोट घडवण्यासाठी टायमर म्हणून वापरलेली घड्याळे आणि सायकलींचा वापर यामुळं हे स्फोट इंडियम मुजाहिदीननं घडवल्याचा संशय बळावलाय.
पुणे स्फोटांमध्ये जखमी झालेल्या दयानंद पाटीलचे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. टेलरिंगचा व्यवसाय करणा-या दयानंदनं एक नाही, दोन नाही तर चार वेळा परदेश वारी केल्याचं उघड झालंय. पुणे स्फोटांच्या तपासाची चक्रं आता दयानंद पाटील याच्या अवतीभवती फिरु लागलीत. स्फोटानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या दयानंद पाटीलनं चार देशांची वारी केल्याचं उघड झालंय. शिवाय त्याच्याशी संबंधित असणा-या सात जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. यांत त्याचा शेजारी रमजान शेख आणि अल्ताफ शेख यांचा समावेश आहे. या स्फोटांसाठी अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. मात्र ते न उडाल्यानं मोठा अनर्थ टळल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे. तसंच पावसामुळं स्फोटांची तीव्रता कमी झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
हे स्फोट अत्यंत नियोजन पद्धतीने करण्यात आले होते. त्यासाठी तीन सायकल्स खरेदी करण्यात आल्या होत्या. सायकल्सवर स्फोटकं ठेवून टायमरच्या सहाय्याने त्याचा स्फोट घडवण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. स्फोटासाठी छर्रेही वापरण्यात आले होते... आरोपींनी ज्या दुकानातून साय़कल्स खरेदी केल्या होत्या त्या दुकानदाराने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचं रेखाचित्र तयार केलं जातंय.
एक दिवस उलटल्यानंतरही पुण्यातले स्फोट कोणी घडवून आणले, या स्फोटांचा सूत्रधार कोण याची नेमकी माहिती पोलिसांना मिळालेली नाही...मात्र दयानंद पाटीलबाबत होणारे खुलासे आणि सायकल खरेदी करणा-यांच्या रेखाचित्रांमुळं तरी स्फोटाचं को़डं उलगडणार का याकडं सा-याचं लक्ष लागलंय.