मांजरी वाचली पण हात गमावला...

एका मांजरीच्या पिल्लाला वाचवायला गेला आणि हात गमावून बसला... पुण्यातल्या एका चिमुकल्याची ही गोष्ट... हात तुटला तरी त्यानं मांजरीच्या पिल्लाला वाचवलं. हात गमावला तरी देवांग जराही घाबरला नाही, अतिशय धीरानं तो या सगळ्या प्रकाराला सामोरा गेला. पुण्यात अडीच तासांत घडलेलं हे थरारनाट्य...

Updated: Jul 24, 2012, 01:39 PM IST

www.24taas.com, पुणे  

एका मांजरीच्या पिल्लाला वाचवायला गेला आणि हात गमावून बसला... पुण्यातल्या एका चिमुकल्याची ही गोष्ट...  हात तुटला तरी त्यानं मांजरीच्या पिल्लाला वाचवलं. हात गमावला तरी देवांग जराही घाबरला नाही, अतिशय धीरानं तो या सगळ्या प्रकाराला सामोरा गेला. पुण्यात अडीच तासांत घडलेलं हे थरारनाट्य...

 

रविवारी दुपारी अडीचची वेळ... ११ वर्षांचा देवांग विश्रांतवाडीतल्या ‘श्री हंस इलाईट’ या बिल्डिंगसमोर खेळत होता. इतक्यात या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये मांजरीचं पिल्लू अडकलेलं त्याला दिसलं. पिल्लाला काढण्यासाठी देवांगनं लिफ्टमध्ये हात घातला. इतक्यात लिफ्ट सुरू झाली. त्यामुळे देवांगचा डावा हात तुटला आणि लिफ्टमध्ये पडला. पण तरीही त्यानं मांजरीचं पिल्लू बाहेर काढलं आणि रस्त्यावर सोडून दिलं.

 

देवांगचं खरं धाडस दिसलं ते त्याचा हात तुटल्यानंतर... लिफ्टमध्ये हात अडकून तुटल्यानंतर देवांग शांतपणे घरी आला. घरात आल्यावर स्वतःच बाथरूममध्ये जाऊन त्यानं रक्त धुतलं. मग आजीसमोर येऊन येऊन उभा राहिला. आजी घाबरली आणि शेजाऱ्यांना बोलावलं. शेजाऱ्यांनी देवांगला हॉस्पिटलमध्ये नेलं. इथल्या डॉक्टरांनी देवांगला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. दुसरीकडे काही शेजारी देवांगचा तुटलेला हात शोधत होते. मग हात लिफ्टमध्ये पडल्याचं देवांगनंच सगळ्यांना सांगितलं.

 

देवांग जहांगीर हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आधी दीड लाख रुपये भरा मगच उपचार करु, अशी आडमुठी भूमिका हॉस्पिटलनं घेतली. कशीबशी थोडीफार रक्कम गोळा झाली आणि देवांगवर उपचार सुरू झाले, त्यानंतर त्याचा हात हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

 

इतक्या लहान वयात देवांगनं दाखवलेली भूतद्या आणि धैर्य निश्चितच कौतुकास्पद आहे. पण सध्या त्याच्या हातावर उपचार सुरू आहेत. त्याचे वडील ड्रायव्हर आहेत तर आई घरकाम करते. अशा बेताच्या परिस्थितीत देवांगला आर्थिक मदतीची गरज आहे. ज्यांना देवांगला मदत करण्याची इच्छा आहे. त्यांनी ९८२२४४५३८६ या क्रमांकावर संपर्क साधावा... मांजरीच्या पिल्लासाठी हात पुढे करणाऱ्या देवांगच्या मदतीलाही अनेक हात येतील, अशी अपेक्षा आहे. ‘झी २४ तास’ही आपल्या प्रेक्षकांना आणि वाचकांना मदतीसाठी आवाहन करत आहे.

 

.