www.24taas.com, पुणे
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत याहीवर्षी वाद निर्माण झालाय. राज्य सरकारने रायगडावरील जमावबंदी उठवावी, अन्यथा जमावबंदी धुडकावून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करू असा इशारा शिवराज्यभिषेक महोत्सव समितीने दिला आहे.
महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजी राजे छत्रपती यांनी पुण्यामध्ये पत्रकारपरिषद घेऊन यावर्षी होऊ घातलेल्या सोहळ्यची माहिती दिली. ५ आणि ६ जुन रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याने घेतलेल्या आक्षेपामुळे सोहळ्याबाबत वाद निर्माण झाला होता. राज्यसरकारच्या मध्यास्तीनंतर हा सोहळा साजरा करण्यास परवानगी मिळाली होती.
यावर्षी मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारनेच रायगडावर जमावबंदी लागू केलीय. या सोहळ्यासाठी देशभरातून लाखभर लोक येत असतात. अशा परिस्थितीत राज्यसरकार सोहळा दडपण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला चोख उत्तरं देण्याची तयारी महोत्सव समितीने दर्शवलीय. विविध हिदुत्ववादी संघटना, इतिहासप्रेमी तसेच मराठा संघटनांच्या पुढाकारातून हो सोहळा साजरा केला जातो.