www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्या विरोधात निवडणुकीतील गैरप्रकारांबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसंच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे याचा तपास करण्याचेही आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
लोकसभा निवडणूकीनंतर मुश्रीफ यांनी संभाजीराजेंनी ५४ लाख रूपये काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार संजय घाटगेंना दिल्याचे व्यक्तव्य केलं होतं. त्यावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार विजय देवणे यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रर केली होती.
संभाजीराजेंनी खर्च खोटा दाखवून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार विजय देवणेंनी केली होती मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने ते न्यायालयात गेले. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. विजय देवणे यांनी हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.