संजय पवार, www.24taas.com, सोलापूर
दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटला वरदायिनी ठरणारी एकरुख उपसा सिंचन योजना गेल्या 18 वर्षांपासून रखडली आहे. अपुरा निधी आणि राजकीय उदासिनता ही यामागची मुख्य कारणं आहेत. 87 कोटींच्या योजनेचा खर्च आता 168 कोटींवर जाऊन पोहचलाय. तब्बल 46 गावांतील ग्रामस्थांचे डोळे या योजनेकडे लागले आहेत.
सोलापूर शहरालगत असलेल्या एकरुख गावातल्या हिप्परगा तलावावर ही उपसा सिंचन योजना सुरु आहे. उजनी धरणातील पाणी कालव्याद्वारे या तलावात साठवणे आणि त्यातून उपसा करुन पुरवणे, अशी ही योजना आहे. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट परिसरातल्या 46 गावांना या सिंचन योजनेचा लाभ होणार आहे.या योजनेसाठी 1994मध्ये आंदोलन उभारण्यात आलं. 1996 साली त्या आंदोलनाला यश आलं आणि 87 कोटींच्या उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली. मात्र राजकीय उदासिनता आणि निधीअभावी ही योजना आजतागायत रखडली आहे आणि 46 गावांचा विकास खुंटलाय.
या योजनेचं 65 टक्के काम पूर्ण झालंय. आजपर्यंत त्यासाठी 71 कोटी रुपये खर्चही झालाय. मात्र दिरंगाईमुळे 87 कोटी रुपयांच्या या सिंचन योजनेचा खर्च आता 168 कोटींवर जाऊन ठेपलाय. हा उपसा सिंचन प्रकल्प सुरु झाल्यास दक्षिण सोलापुरातील 7200 हेक्टर, तर अक्कलकोट तालुक्यातील 10, 110 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. योजनेला 50 कोटी रुपये निधी मिळाल्यास 2014 साली ही योजना पूर्ण होऊ शकते.
केंद्रीय ऊर्जामंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. तरीही या योजनेची निधीअभावी ही परवड आहे तशीच आहे. जवळ पाणी असतानाही 46 गावांना उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दुष्काळात टँकर या गावांच्या पाचवीला पुजलेला आहे. लोकप्रतिनिधींनी योजनेच्या निधीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आता पुन्हा जोर धरु लागली आहे.