रविवारी घराबाहेर पडताय? रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे TimeTable पाहा

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 16, 2024, 07:09 AM IST
रविवारी घराबाहेर पडताय?  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे TimeTable पाहा  title=
Central Railway and western railway to operate mega block between on Sunday

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येतेय. रेल्वेच्या तिन्ही मार्गिंकावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा मुख्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी तर पश्चिम रेल्वेवर गर्डर उभारणीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवार हा प्रवाशांसाठी तापदायक ठरु शकतो. 

मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 या कालावधीत ब्लॉक असेल. तर, ब्लॉक कालावधीत माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर, या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तर, विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसेल. 

हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते 4.10 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी/ बेलापूर/ पनवेल अप आणि डाउन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल/ वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे ते वाशी/ नेरुळ स्थानकांवरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अप आणि डाउन धीम्या मार्गावर 12 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 11.30 ते रविवारी सकाळी 11.30 या कालावधीत घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सेवा अंधेरी आणि गोरेगाव/बोरीवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवल्या जाणार असल्याने राम मंदिरात कोणत्याही गाड्या थांबणार नाहीत. 

मध्य रेल्वेवरुन सुटणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा फक्त अंधेरीपर्यंतच धावतील. तसंच, काही चर्चगेट-गोरेगाव धीम्या लोकल अशंत रद्द होतील आणि अंधेरीहून पूर्ववत केल्या जातील.