www.24taas.com, सांगली
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करेवाडी गावाकऱ्यांच्या रेशनकार्डांचा प्रश्न ‘झी 24 तास’नं लावून धरल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. रेशनकार्डांसाठी विशेष कॅम्प लावून ग्रामस्थांना एका दिवसात रेशनकार्ड देण्याचं आश्वासन तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील यांनी ‘झी 24 तास’शी बोलताना दिलं आहे.
सांगली जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त जनतेच्या अनेक समस्यांचे भीषण वास्तव ‘झी 24 तास’नं मांडले आहेत. जत तालुक्यातल्या करेवाडी गावातील लोक गेल्या बारा वर्षांपासून रेशनकार्डच्या प्रतिक्षेत आहेत. गावातल्या ऐंशी टक्के लोकांना रेशनकार्डच देण्यात आलेली नाहीत. वेळोवेळी मागणी करूनही इथल्या दुष्काळग्रस्तांची पाणी आणि चाऱ्याबरोबरच आता अन्न-धान्यासाठीही परवड सुरु आहे. या गावातील लोकांना दुष्काळाचा फटका बसतोय. पिण्याचं पाणी आणि चाऱ्याअभावी इथल्या लोकांचे आणि जनावरांचे खूप हाल सुरु आहेत. टँकर फक्त कागदावर असून चार-चार दिवस ग्रामस्थांना पिण्याचं पाणीदेखील मिळत नाही.
चाऱ्याबाबतही हीच स्थिती आहे. तर ग्रामसेवक आणि तलाठी गावातच येत नसल्यामुळं ग्रामस्थांची मोठी गैरसोय होतेय. झी 24 तासच्या या बातमीनंतर रेशनकार्डांची समस्या लवकरच सोडवण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिलय.
व्हिडिओ पाहा :
[jwplayer mediaid="101421"]