पवार-चव्हाणांमध्ये तू तू... मै मै

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसमध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उडी घेतली आहे. पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. तर मुख्यमंत्र्यांनीही पवारांच्या टीकेला चोख उत्तर दिलंय.

Updated: Jun 3, 2012, 08:43 AM IST

 www.24taas.com, मुंबई

 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसमध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उडी घेतली आहे. पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. तर मुख्यमंत्र्यांनीही पवारांच्या टीकेला चोख उत्तर दिलंय.

 

पहिल्यांदा आघाडीचे सरकार चालवण्याची कला शिकण्याचा सल्ला देत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना छेडलं होतं. याला एक महिना उलटण्याच्या आतच पुन्हा एकदा पवार मुख्यमंत्र्यांवर बरसले. यावेळी थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्णय क्षमतेबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मुख्यमंत्री धोरणाची अंमलबजावणी करत नसल्यामुळेच राज्यातील मारुती आणि महिंद्रासारखे मोठे उद्योग राज्याबाहेर गेले, असा थेट आरोप पवारांनी केला. मग, मागे राहतील ते पृथ्वीराज चव्हाण कसले! मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही पवारांच्या टीकेला उत्तर दिलं. केंद्रात आणि राज्यात आघाडीची सत्ता असली तरीही सरकार काँग्रेसचेच आहे, असं मुख्यमत्र्यांनी मित्रपक्षांना ठणकावून सांगितलंय.

 

पृथ्वीराज चव्हाण यांचे घराणे आणि शरद पवार यांचा वाद अगदी जुना आहे. चव्हाणांचे घराणे सुरुवातीपासूनच पवारांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण राज्यात मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर आघाडीचं सरकार असूनही पवार त्यांना कानपिचक्या देण्याची संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणही कधी राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून तर कधी पाटबंधारे खात्याच्या श्वेत पत्रिकेच्या मुद्यावरून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा राजकीय तू तू... मै मै... नंतर मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर पवारांचं काय प्रत्यूत्तर असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलीय.

 

.