www.24taas.com, मुंबई
आषाढी वारीत जमणा-या लाखो वारक-यांना समोर ठेवून एका विमा कंपनीनं आरोग्य विमा बाजारात आणलाय. वारीदरम्यान वारक-यास काही झाल्यास अवघ्या 30 रुपयांच्या प्रिमियमवर एक लाखांचे संरक्षण मिळणारा आहे.
ज्ञानोबा-तुकोबांचा जयजयकार करत लाखो वारकरी आषाढी वारीत सहभागी होतात. एवढ्या मोठ्या संख्येनं सहभागी होणा-या वारक-यांच्या या गर्दीकडं आता विमा कंपन्यांही आकर्षित झाल्यात. वारीत संभावित धोका लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी भक्तांसाठी खास विमा प्लॅन बाजारात आणलेत.
एका विमा कंपनीनं बाजारात आणलेल्या आरोग्य विम्यामध्ये फक्त ३० रुपयांचा प्रिमियम भरून 1 लाख रुपयांचा हेल्थ कवर वारीदरम्यान मिळणाराय. १५ दिवस मुदतीच्या या प्लॅनमध्ये वारीदरम्यान भक्ताचा अपघाती मृत्यू झाल्यास आणि कायमचे अंपगत्व आल्यास विम्याची रक्कम मिळणाराय. तसंच हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यास उपचाराचा खर्चही विमा कंपन्या करणार आहेत.
मागील वर्षी वारीहून परतणा-या वारक-यांच्या दिंडीत ट्रक घुसल्यानं मोठा अपघात झाला होता. यामध्ये अनेक वारक-यांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळं खास वारक-यांना नजरेसमोर ठेवून विमा कंपनीनं काढलेली ही आरोग्य विम्याची योजना वारक-यांना चांगलीच लाभदायक अशी ठरणाराय. महाराष्ट्रातील आषाढी वारीप्रमाणे भारतात अशी अनेक तीर्थस्थळे आहेत की, ज्याठिकाणी लाखो लोक जमा होतात. त्यामुळं विमा कंपन्या अशा भक्तांच्या गर्दीकडं आकर्षित होत आहेत.
विठ्ठलाच्या भक्तीत दंग असणा-या वारक-यांच्या पाठिशी विठ्ठल असतोच. परंतू वेळ काही सांगून येत नाही. त्यामुळंच हा वारकरी विमा वारक-यांच्या दृष्टीनं फायदेशीर ठरणारा आहे.