ट्विटरच्या तंबूत अरब राजपूत्राचा चंचूप्रवेश

सौदीचे प्रिन्स अलवालीद बिन तलाल यांनी ट्विटरमध्ये ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. प्रिन्स अलवालीद बिन तलाल हे जगातील अनेक बलाढ्य कंपन्यांमध्ये गुंतवणुकदार आहे. सौदीचे राजे यांचे पूतणे असलेले अलवालीद यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे मुल्यांकन २० बिलियन डॉलर्स इतकं आहे.

Updated: Dec 19, 2011, 02:35 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

  सौदीचे प्रिन्स अलवालीद बिन तलाल यांनी ट्विटरमध्ये ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. प्रिन्स अलवालीद बिन तलाल हे जगातील अनेक बलाढ्य कंपन्यांमध्ये गुंतवणुकदार आहे. सौदीचे राजे यांचे पूतणे असलेले अलवालीद यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे मुल्यांकन २० बिलियन डॉलर्स इतकं आहे. अलवालीद यांनी न्यूज कॉर्पमध्ये सात टक्के समभाग विकत घेतले आहेत. ट्विटरमध्ये अलवालीद आणि त्यांच्या किंगडन होल्डिंग इनवेस्टमेंट फर्मने गुंतवणूक केली आहे.

 

ट्विटरचे मुल्यांकन ८ बिलियन डॉलर्स असून अलवालीद यांनी भागभांडवलाच्या साधारणता ३.७५ टक्के समभाग विकत घेतले आहेत. ट्विटरचा वापर जगभरात १०० दशलक्ष लोक करतात. अरब जगतात भडकलेल्या जनतेच्या उद्रेकात ट्विटरने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सौदी अरेबियाला देशात असंतोषाचा भडका उडू नये यासाठी सामाजिक क्षेत्रात १३० मिलियन डॉलर्सचे पॅकेज जाहीर करावे लागले.

 

सौदी अरेबियातील जनता आता सॅटेलाईट टीव्ही, ऑनलाईन न्यूज साईटस आणि सोशल नेटवर्किंगचा वापर मोठ्या प्रमाणावर करु लागली आहे. सौदी अरेबियात पत्रकारांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. सिटी बँकेत हिस्सा असणाऱ्या अलवालीद यांनी अरब जगतातील राजकारणात व्यापक सहभाग, खुल्या वातावरणात निवडणुका तसेच रोजगार निर्मितीबाबत आपलं मत स्पष्टपणे मांडले आहे.