www.24taas.com, डोनेत्सक, यूक्रेन
युरो कप २०१२ मध्ये ग्रुप ‘डी’च्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं फ्रांसला १-१ च्या बरोबरीत रोखलंय. युक्रेनमधल्या डोनेत्सक शहरातल्या डोनबास ऐराना स्टेडिअमवर सोमवारी हा सामना रंगला. फ्रांस गतवर्षीची विजयी टीम आहे.
खेळाच्या ३० व्या मिनिटाला इंग्लंडनं आपला पहिला गोल नोंदवून १-० नं एक पाऊल पुढे टाकलं. कॅप्टन स्टीव्हन गेरॉल्डच्या दमदार फ्री किकवर जोलेएन लेस्कॉटनं एक शानदार गोल केला. हेडरच्या साहाय्यानं केलेल्या या गोलनं फ्रांसचा गोलरक्षक ह्युगो लॉरिसला संधी दिली होती. पण त्यानं ती हुकवली त्यामुळे इंग्लंडची या सामन्यात एक शानदार सुरुवात झाली.
त्यानंतर मात्र नवव्या मिनिटाला फ्रांसनं आपला पहिला गोल करून सामन्यात इंग्लंडची बरोबरी केली. ३९व्या मिनिटाला फ्रांसच्या समीर नासरीनं डी. एरियाच्या बाहेरून उजव्या पायानं खालच्या दिशेनं जाणारा एक जोरदार शॉट मारला. इंग्लडचे गोलरक्षक क्षणभर गोंधळून गेले. त्यामुळे प्रतिकाराचा त्यांचा प्रयत्न फोल ठरला आणि नासरीनं मारलेला शॉट डायरेक्ट गोलपोस्टमध्ये स्थिरावला.
मध्यांतरापर्यंत दोन्ही टीम्स १-१च्या बरोबरनं एकमेकांना झुंज देत होत्या. दोन्ही टीम्सनं गोल करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ते साध्य झालं नाही. आणि सरतेशेवटी सामना १-१ च्या बरोबरीनंच संपला आणि दोन्ही टीमला १-१च्या अंकांनी आपापलं समाधान करून घ्यावं लागलं.