झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली
टीम इंडियाने दिल्ली वनडे जिंकून सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं दिल्ली वनडेत 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीची धडाकेबाज सेंच्युरी आणि गौतम गंभीरसोबत त्यानं केलेली नाबाद द्विशतकी पार्टनरशिप, विनय कुमारनं घेतलेल्या 4 विकेट्स जोरावर टीम इंडियानं दिल्ली वनडेत सहज विजय मिळवला.
[caption id="attachment_2504" align="alignleft" width="300" caption="विराटची 'विराट' खेळी"][/caption]
भारतीय फास्ट बॉलर्सनी शून्यावरच इंग्लंडचे ओपनर्स पॅव्हेलियनमध्ये धाडले. सुरुवातीपासूनच भारतीय बॉलर्सनी इंग्लिश बॅट्समनवर वर्चस्व राखताना एकालाही क्रिझवर जास्तवेळ टिकू दिलं नाही. भारताच्या युवा फॉस्ट बॉलर्सच्या भेदक मा-यापुढे इंग्लंडचा एकही बॅट्समन हाफ सेंच्युरीही पूर्ण करू शकला नाही.
पीटरसन आणि मिडल ऑर्डरच्या बॅट्समनच्या कामगिरीमुळं इंग्लंडनं दोनशे रन्सचा टप्पा पार केला. भारताकडून फास्ट बॉलर्सनी 7 बॅट्समनला आऊट करताना इंग्लंडला 48. 2 ओव्हर्समध्ये 237 रन्सवर ऑलआऊट केलं.
कोटलावर 238 रन्सचं लक्ष्य टीम इंडियासाठी फारसं अवघड नव्हतंच. मात्र पार्थिव पटेल आणि अजिंक्य रहाणे अवघ्या 29 रन्सवर झटपट पॅव्हेलियनमध्ये परतल्यानं टीम इंडिया अडचणीत सापडली. त्यानंतर मात्र विराट कोहली आणि गौतम गंभीरनं इंग्लिश बॉलर्सला कोणतीच संधी दिली नाही. दोघांनी घरच्या मैदानावर आपणच दादा असल्याच दाखवून देताना इंग्लिश बॉलर्सला चांगलाच चोप दिला.
विराटनं 98 बॉल्समध्ये 112 रन्सची धडाकेबाज खेळी केली. गौतम गंभीरनेही 84 रन्सची शानदार नॉट आऊट खेळी केली. दोघांनी 209 रन्सची नॉट आऊट पार्टनरशिप करताना भारताला 80 बॉल्स आणि 8 विकेट्स राखून सहज विजय मिळवून दिला. दिल्ली वनडेतील विजयासह भारतानं सीरिजमध्ये 2-0नं आघाडीही घेतली.