Raj Thackeray on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगांची सलग दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरुन संताप व्यक्त केला असून, सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत? अशी विचारणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांकडून बॅग तपासली जात असल्याचे व्हिडीओ शूट केले असून ते शेअरही केले आहेत. दरम्यान यावरुन राज ठाकरेंनी (Raj Thackeray) जाहीर सभेत भाष्य केले असून टोले लगावले आहेत. ज्याच्या हातातून कधी पैसे बाहेर आले नाहीत. त्याच्या बॅगेत काय सापडणार असा टोला त्यांनी लगावला आहे. भांडुपमधील जाहीर सभेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दुस-या दिवशी तपासणी करण्यात आली. लातूरच्या औसा इथं हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगची आज पुन्हा तपासणी करण्यात आली. कालच यवतमाळमध्येही ठाकरेंच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त करत मोदी-शाहांसह सत्ताधा-यांवर निशाणा साधला. मात्र यावरुन राज ठाकरेंनी त्यांनाच टोले लगावले आहेत.
"ज्यांच्या हातात गेली 20-25 वर्षांपासून महापालिका आहे, त्यांच्यामुळे शहराचा तर विचका झालाच आहे, पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झाला आहे. बाळासाहेब असताना या सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष तरी असायचं. नंतर तर फक्त पैशांवर बारीक लक्ष आहे," अशी टीका राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला केली.
पुढे ते म्हणाले, "आज, परवा उद्दव ठाकरेंची बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांनाही काय कुठे तपासायचं हे पण कळत नाही. ज्याच्या हातातून कधी पैसे बाहेर आले नाहीत, त्याच्या बॅगेत काय सापडणार? जास्तीत जास्त हातरुमाल आणि कोमट पाणी. कशासाठी बॅग तपासत आहात? त्याचं केवढं औडंबर, आमच्याही बॅगा तपासल्या आहेत. त्यांचं काम ते करत असतात. जुहू विमानतळावर जाताना दोन-तीनदा आमच्याही बॅगा तपासतात, ते नेहमीचं आहे".
"एवढा काय तमाशा करायचा आणि त्याचे व्हिडीओ काढत आहेत. तुझं कार्ड दाखव, कोणता अधिकारी आहेस तू, कधी नोकरीला लागला, तुझं अपॉईंटमेंट लेटर दाखव. अपॉईंटमेंट लेटर कोणी खिशात घेऊन फिरतं का? तुम्ही नोकरी करता, कोणी किशात घेऊन फिरतं का लेटर? काय विचारायचं हेदेखील माहिती नाही. माझ्या गळ्यात फक्त मुख्यंमंत्रीपदाची माळ घाला बाकी गेलं तेल लावत. हा सगळा तमाशा करुन ठेवला आहे," असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.