राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, नेमकं कारण काय?

Sanjay Raut Chair In MNS Sabha: राज ठाकरेंच्या विक्रोळी येथील सभेत संजय राऊतांच्या नावाची खुर्ची पाहायला मिळाली. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 12, 2024, 08:56 PM IST
राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, नेमकं कारण काय? title=
मनसे विक्रोळी सभा

Sanjay Raut Chair In MNS Sabha: विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विक्रोळी येथील सभेत एक लक्ष वेधून घेणारा प्रकार पाहायला मिळाला. राज ठाकरेंच्या विक्रोळी येथील सभेत संजय राऊतांच्या नावाची खुर्ची पाहायला मिळाली. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया. 

राज ठाकरेंच्या मंचावर संजय राऊतांसाठी खुर्ची ठेवण्यात आली होती. यासंदर्भात मनसैनिकांनी माध्यमांना माहिती दिली आहे. राज ठाकरेंची विक्रोळी मध्ये होणाऱ्या सभेला मनसेकडून संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं, असे मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागलाय. ते काहीही बोलतात. त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी राऊतांसाठी खुर्ची रिकामी ठेवण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राजकीय विचार कसे असावेत आणि विचारांची देवाण घेवाण कशी असावी या यासाठी निमंत्रण असल्याचे ते म्हणाले. 

'बाळासाहेबांचे फोटो लावून उद्धव ठाकरे मतं मागतात'

दिंडोशीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. "बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आहे?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. "बाळासाहेबांचे फोटो लावून उद्धव ठाकरे मतं मागतात. उध्दव ठाकरे पंजाचा प्रचार करतात. काँग्रेस, पवार गट बाळासाहेबांचं नावही घेत नाही," असा टोला राज यांनी लगावला. याचाच संदर्भ देत राऊत यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. "महाविकास आघाडीच्या सध्या सभा होत आहेत. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे पण त्यांचं नावही घेतलं जात नाही अशी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते पंजाचा प्रचार करत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत," असं सांगत राऊतांना यावर काय म्हणायचं आहे हे पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला 

"दोन सभा काय त्यांनी इथे घर घेऊन राहिलं पाहिजे. जसं नरेंद्र मोदी, अमित शाह महाराष्ट्रात मुक्कामाला आहेत. तसं काही नेत्यांनी विक्रोळीत, कांजूर मार्ग, डम्पिंग ग्राउंडच्या आसपास जागा रिकाम्या आहेत तिथे येऊन रहावं. मला काही अडचण नाही. ही लोकशाही आहे. कोणी कुठे किती सभा घ्याव्यात यावर काही निर्बंध नाहीत. घ्या सभा घ्या. आमच्यावर टीका करा. कारण ती देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे की आमच्यावर टीका करावी. ही स्क्रीप्ट गुजरातवरुन आलेली आहे," असा टोला ठाकरेंच्या प्रवक्त्यांनी लगावला.

'तरी येणार आमची शिवसेनाच'

"विक्रोळीत राज ठाकरेंना दोन दोन सभा घ्याव्या लागत आहेत," असं म्हणत राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच संजय राऊत यांनी, "तरी येणार आमची शिवसेनाच. विक्रोळीत कोणाला दोन दोन सभा घ्याव्या लागत असल्या तर याचा अर्थ त्यांचा पक्ष इथे कमजोर आहे. त्यांनी दोन सभा घेतल्या तरी येणार सुनिल राऊतच, सगळ्यांनाच माहिती आहे," असं उत्तर दिलं.