चेन्नईचा रॉयल्सवर ४ गडी राखून विजय

आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा तोंडातला घास हिराहून घेतला. चार गडी राखून विजय मिळवत चेन्नईने प्ले ऑफसाठीचे आपले आव्हान कायम राखले आहे.

Updated: May 11, 2012, 12:23 PM IST

www.24taas.com, जयपूर

 

आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा तोंडातला घास हिराहून घेतला. चार गडी राखून विजय मिळवत चेन्नईने प्ले ऑफसाठीचे आपले आव्हान कायम राखले आहे. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला चांगलाच घाम गाळावा लागला. शेवटच्या षटकापर्यंत त्यांना झगडावे लागले.

 

 

सामना सुरू असताना अचानक आलेल्या  पावसामुळे तीन वेळा मॅचला  थांबवावी लागली. चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सला ६ विकेटवर १२६ रन्स कमावण्याची संधी दिली. पण, पाऊस सुरू झाला आणि सगळ्यांचीच दाणादाण उडाली. अर्थातच बॉलिंगसाठी ही परिस्थिती अनुकूल नव्हती त्यातच रॉयल्सनी नियमित अंतरावर आपले विकेटस् गमावले. त्यातल्या त्यात ब्रैड हाजनं ३३ रन्स् तर स्टुअर्ट बिन्नीनं २७ रन्स् काढले. हिल्फेनहासनं लागोपाठ टाकलेल्या ४ ओव्हर्समध्ये ८ रन्स देऊन २ विकेट्सही मिळवल्या. महेशनंही २१ रन्स् देऊन २ विकेट्स घेतल्या.

 

 

पाऊस असूनही टॉस केला गेला. टॉस जिंकणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं राजस्थान रॉयल्सला बॅटींगची संधी दिली.  पहिला बॉल टाकला गेला आणि पाऊस सुरू झाला. त्यामुळे जवळजवळ ४५ मिनिटांचा खेळ वाया गेला. पावसातच सुरू असलेल्या खेळामध्ये रॉयल्सनं दहाव्या ओव्हरमध्ये ५० पार केले होते. पण यानंतरच्या पुढच्या सात ओव्हर्समध्ये फक्त एकदाच बॉल सिमारेषा पार करू शकला. योहान बोथा १२ रन्स् करून शॉट मारण्याच्या प्रयत्नात असतानाच आऊट झाला. हाजसुद्धा बोथाची 'री' ओढताना आऊट झाला.  दिशांत याग्निकनं शेवटच्या ओव्हरमध्ये दोन चौकार ठोकून १० रन्स् वसूल केल्या.