www.24taas.com, दुबई
राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून शुक्रवारी निवृत्तीचा निर्णय घोषित केला. आपल्या अभेद्य फलंदाजीमुळे द वॉल ही सार्थ बिरुदावली मिरवणारा हा महान फलंदाज कसोटी क्रिकेटमधील ऑल टाईम बेस्टच्या यादीत ३० व्या क्रमांकावर आहे.
कर्नाटकच्या ३९ वर्षाच्या या फलंदाजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत २२६ अव्वल स्थानावर राहण्याचा पराक्रम करत ८९२ रेटिंग प्राप्त केलं आहे असं आयसीसीने आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे. द्रविडने मार्च २००५ मध्ये ही कामगिरी केली होती. भारतीय फलंदाजांमध्ये फक्त सुनील गावस्कर ९१६ आणि सचिन तेंडूलकर ८९८ हे दोघेजण द्रविडच्या पुढे आहेत.कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये द्रविड १९ व्या स्थानावर आहे.
राहुल द्रविडने इंग्लंडच्या विरुद्ध १९९६ साली क्रिकेटची मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर पदार्पण केलं होतं. द्रविडने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध चेन्नई कसोटीत खेळताना दोन्ही डावात अर्धशतक झळकावत ८०० गुणांचा अडथळा मार्च १९९८ साली पार केला होता. त्यानंतर नऊ महिन्यांनी द्रविडने न्युझिलँड विरुद्ध हॅमिल्टनच्या कसोटीत १९० आणि १०३ नाबाद अशी तडाखेबंद बॅटिंगचं प्रदर्शन घडवलं होतं. पण सचिनने त्याला मागे टाकल्याने त्यावेळेस द्रविड फक्त २६ दिवस अव्वल स्थानावर राहु शकला.
द्रविडने पाकिस्तानच्या विरुद्ध रावळपिंडीतल्या मार्च २००४ सालच्या कसोटीत खेळताना सामना जिंकून देणारी द्विशतकी खेळी करत परत एकदा रँकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं होतं. त्यानंतर जुलै २००४ ते जानेवारी २००५ या सहा महिन्यांच्या कालावधीत द्रविडने अव्वल स्थान राखलं होतं. द्रविडने परत मार्च २००५ मध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली पण त्यावेळेस फक्त एक आठवडाच तिथं टिकू शकला कारण दक्षिण आफ्रिकेच्या कॅलिसने त्याला मागे टाकलं.
द्रविडने एक दिवसीय सामन्यात क्रमवारीत पटकावलेलं पाचवं रँकिंग ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी. द्रविडने मार्च १९९९ ते ऑक्टोबर २००७ या कालावधीत पहिल्या २५ जणांमध्ये आपलं स्थान टिकवलं होतं.