www.24taas.com, दुबई
आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी करत ८४६ अंकांसह तिसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या क्रमवारीत सुधारणा करून चौथ्या स्थानावर गेला आहे. तर ऑफस्पिनर अश्विननेही गोलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांची सुधारणा करत सहावे स्थानावर जाण्यात यश मिळवले आहे.
गेल्या दहा वन डे सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने सातत्याने कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सिरीज असो किंवा तिरंगी मालिका किंवा आशिया कप या तीनही स्पर्धेमध्ये विराटने आपले सातत्य कायम राखत धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिडल ऑर्डरमध्ये केलेल्या उत्कृष्ठ फलंदाजीमुळे रँकिंगमध्ये धोनीला स्थान मिळाले. धोनीने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरूद्धच्या तिरंगी मालिकेत ४४,५८ आणि ५६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर बांगलादेशमध्ये झालेल्या आशिया करंडकातही धोनीने श्रीलंकेविरूद्ध ४६ आणि यजमानांविरूद्ध नाबाद २१ धावा केल्या होत्या. धोनी ७५२ अंकासह चौथ्या स्थानी आहे.
अश्विनने एकदिवसीय क्रमवारीत कमालीची सुधारणा करताना कारकीर्दीतील सर्वोत्तम क्रमांक पटकाविला आहे. आशिया करंडकात अश्विनने तीन एकदिवसीय सामन्यात पाच गडी टिपले होते. पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये अश्विन एकमेव भारतीय खेळाडू आहे. ६७६ गुणांसह अश्विन सहाव्या स्थानी आहे.
आपला सचिन २७ व्या स्थानावर
महाशतक झळकाविणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रमवारीत दोन गुणांची प्रगती केली आहे. एकदिवसीय क्रमवारीत तो २९ वरून २७ व्या स्थानी पोहोचला आहे.