वॉर्नने दिल्या सचिनला शुभेच्छा

ऑस्ट्रेलियन स्पिनर शेन वॉर्नला सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं १०० वं शतक ऑस्ट्रेलियाविरुद्धाच्या दौऱ्यातच झळकावेल या बद्दल काहीच शंका वाटत नाहीये. वॉर्नने या महान फलंदाजाला २६ डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीतच या विश्व विक्रमाचा टप्पा गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Dec 22, 2011, 01:24 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

ऑस्ट्रेलियन स्पिनर शेन वॉर्नला सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमधलं १०० वं शतक ऑस्ट्रेलियाविरुद्धाच्या दौऱ्यातच  झळकावेल या बद्दल काहीच शंका वाटत नाहीये. वॉर्नने  या  महान फलंदाजाला २६ डिसेंबर रोजी सुरु  होणाऱ्या  पहिल्या  कसोटीतच या विश्व विक्रमाचा टप्पा गाठण्यासाठी  शुभेच्छा  दिल्या आहेत. मला वाटतं सचिन १०० वं शतक  ऑस्ट्रेलियातच  झळकावेल पण माझ्या इच्छा आहे की त्याने ते मेलबॉर्नमध्ये  साजरं करावं असं वॉर्न एका समारंभात म्हणाला. मेलबर्न  क्रिकेट ग्राऊंडवर वॉर्नचा ३०० किलो वजनाचा ब्राँझच्या पुतळ्याचे अनावरण झालं त्या प्रसंगी तो बोलत होता.

 

वॉर्नने आपल्या कारकिर्दीत कसोटी सामन्यांमध्ये सचिनला फक्त तीन वेळाच बाद केलं आहे. पण त्याला सचिनबद्दल प्रचंड आदराची भावना आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी सामना सचिनच्या कारकिर्दीतील १८५ वा कसोटी सामना असेल. आता पर्यंत सचिनने ३०३ डावात (इनिंग) ५६.०३ च्या सरासरीने १५,१८३ धावांचा पाऊस पाडला आहे. सचिनने ४५३ एक दिवसीय सामन्यांमध्ये ४५.१६ च्या सरासरीने ४८ शतकांसह १८,१११ धावांचा वर्षावही केला आहे. पण तेंडूलकराला १०० वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी झगडावं लागलं आहे. त्याने एक दिवसीय सामन्यातले शेवटचे शतक दक्षिण आफ्रिके विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये नागपूरला फटकावलं होतं. तर कसोटी शतकही दक्षिण आफ्रिके विरुद्धच मागच्या वर्षी जानेवारीत केप टाऊन इथे झळकावलं होतं. भारतीयांप्रमाणेच जगभरात साऱ्यांनाच सचिनच्या १०० व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतिक्षा आहे.