www.24taas.com, नवी दिल्ली
हैदराबादमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर पंतप्रधान कार्यालयाने शांतता राखण्याचंही आवाहन केलं आहे. “हा अत्यंत नृशंस हल्ला आहे. या हल्ल्याच्या दोषींना कडक शासन करण्यात येईल. तसंच सामान्य जनतेने न घाबरता शांतता राखावी.”
हैदराबादमधील स्फोटानंतर केंद्रीय मत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली. यामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांना घडलेल्या घटनेबद्दल वृत्त देम्यात आलं. “पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हैदराबादमधील बॉम्बस्फोटांचा तीव्र निषेध केला आहे. बॉम्बस्फोटात प्राण गमावणाऱ्या लोकांबद्दल आपलं दुःख व्यक्त केलं आहे. याच बरोबर सर्वांनी शांतता राखावी, असंही आवाहन पंतप्रधान करत आहेत.” असं पंतप्रधानांच्या अधिकृत वक्तव्यामध्ये सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधानांनी बॉम्बस्फोटामधील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेश राज्य सरकारतर्फेही मृतांच्या नातेवाइकांना ६ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.