www.24taas.com, मुंबई
तब्बल ७२ दिवसांनंतर अजित पवार पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेत. राजभवनात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याक़डून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळपास सगळेच मंत्री यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यावर विरोधकांनी मात्र बहिष्कार घातला होता. विरोधकांपैकी कोणताही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळं सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक राहणार याचे संकेत मिळालेत.
अजित पवारांच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकर्ते आणि नेत्यांची तुफान गर्दी होती. सिंचनातल्या गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर २५ सप्टेंबरला अजित यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.