सरकारमधून बाहेर पडा- राष्ट्रवादी आमदार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी अजित पवारांना समर्थन देत, सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 25, 2012, 05:55 PM IST

www.24taas.com, मुंबई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी अजित पवारांना समर्थन देत, सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे.
सरकारमध्ये राहण्याचा अर्थ नसल्याने सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे. आता काँग्रेसला बाहेरून पाठिंबा द्या अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी जलसंपदा विभागात घोटाळा झाल्याचे आरोप मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पार यांनी तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमुखाने ही मागणी केली आहे.
अजित पवार यांचा राजीनामा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आरोपातून मुक्त होईलपर्यंत पदमुक्त राहील अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. या दरम्यान पक्षाचे काम करीत राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जलसंपदामंत्री असताना तीन महिन्यांत सर्व नियम डावलून २० हजार कोटींच्या निधीचं वाटप केल्याचा विरोधकांचा आरोप होता. राजीनामा दिल्यानंतर अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात यावं, उर्जा मंत्रालय राजेश टोपेंकडे सोपवण्यात यावं असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.
आरोपमुक्त होईपर्यत मंत्रीपद स्वीकारणार नाही असा पवित्रा घेत अजित पवारांनी मी सगळी पदे सोडली आहेत, हवी ती कारवाई करण्यास मोकळे आहेत, असेही यावेळी सांगितले. कोणीही कितीही चांगली कामगिरी केली तरीही कधीही असं वातावरण निर्माण केलं जातं की हा माणूस चांगल काम करीतच नाही, जो अधिकार मला होता, तो मी वापरला, मी कुठे चुकलो असेल असे वाटत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मी सत्तेत आहे म्हणून लोक म्हणतील कारवाई होत नाही. मात्र त्यामुळेच मी सगळी पदे सोडली आहेत.
माझी काम करण्याची पद्धत अशीच आहे. या पुढे आता पक्षाचं काम करतंच राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

काय आहे जलसंपदा घोटाळा
जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता विजय पांढरेंनी त्यांच्या खात्याताली घोटाळे चव्हाट्यावर मांडला होता. मागील वीस वर्षात 60 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा पांढरेंनी केला होता. राज्यातील 90 टक्के उपसा सिंचन योजना बंद असल्याचं त्यांनी तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट केलंय. वादग्रस्त तेरा विषयांवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनीच केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.
पांढरे पत्रानं जलसंपदा विभागाच्या कारभाराचे धिंडवडे काढलेत. जलसंपदा विभागातील मेरी संशोधन संस्थेत महाराष्ट्र प्रशिक्षण प्रबिधीनीचे मुख्य अभियंता असलेल्या विजय पांढरेंनी पाटबंधारे अधिकारी, राजकीय नेते आणि ठेकेदार कशी लूट करताहेत हे स्पष्ट केलंय. मांजरपाडा प्रकल्प, गोसीखुर्द ,तापी पाटबंधारे,कोकणातील योजना आणि कृष्णा खोऱ्यातील अनेक धरणांच्या बांधकामातील गोंधळ त्यांनी उघड केला आहे. खोऱ्यात पाणी उपलब्ध नसताना दर्जाहीन कामे केली जात असून पन्नास कोटीचे पाचशे कोटीत केले जात असल्याचं गंभीर आरोप त्यांनी केले होते.
उपसा सिंचन योजना पांढरा हत्ती ठरल्याने राज्यातील ९० टक्के योजना बंद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. उपसा सिचन महामंडळाचा कारभार बोगस असल्याचं त्याचं म्हणणं आहे. अवाजवी सिमेंट आणि स्टीलचा वापर करण्याच्या नावाखाली दिवसाढवळ्या लूट सुरु असल्याचं त्यांनी दाखवून दिलं होतं.
भ्रष्टाचार आणि गैरकारभाराविरोधात लढणा-या पांढरे यांची तापी पाटबंधारे महामंडळातून बदली करत त्यांना बाजूला टाकण्यात आले आहे. मात्र विजय पांढरे त्यांच्या विभागातील बाजीराव सिंघम ठरले आहेत