आज पालख्यांचा साताऱ्यात मुक्काम...

आता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 8, 2013, 12:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
माऊलींच्या पालखीनं काल नीरा स्नान आटोपत हजारो वारकऱ्यांच्या साथीत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्यातला माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम रविवारी लोणंदमध्ये होता. माऊलींच्या चांदीच्या पादुकांना संस्थानप्रमुख आणि सोहळ्यातील मानकऱ्यांनी स्नान घातल्यानंतर वारकऱ्यांनी माऊली नामाचा एकच जयघोष केला. स्नानानंतर पादुका पुन्हा रथात ठेवून माऊलींच्या रथ मार्गस्थ झाला. पाडेगाव येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीनं साताऱ्याचे पोलीस अधिक्षक प्रसन्ना आणि पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी माऊलींच्या पालखीचं स्वागत केलं. आता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.

तुकोबांच्या पालखीची वाटचाल...
दरम्यान, तुकोबांच्या पालखीचा मुक्काम काल बारामतीमध्ये होता. शारदा विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणात उभारलेल्या मंडपामध्ये संध्याकाळी सातच्या सुमारास पालखी आली आणि भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. केवळ एक रात्रच दिंडी बारामतीमध्ये असल्यामुळे परिसरातले भाविक मोठ्या संख्येनं दर्शनाला आले होते.
तुकोबांची पालखीनं आज सकाळी ७च्या सुमारास बारामतीतून मोतीबागेच्या दिशेनं प्रस्थान केलंय. आज पालखी मोतीबाग, पिंपळी ग्रेप, लिमटेक यामार्गे काटेवाडीकडे प्रवास करेल. काटेवाडी इथं दुपारचं भोजन आणि थोड्यावेळ आराम असेल. त्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी तुकोबांची पालखी सणसर इथं दाखल होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.