गोदावरीकाठी संस्कृतींचा संगम

युवक बिरादरी आयोजित गोदावरी मिलन अभियानात हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीचा वेध घेत राम, कृष्णांचा कार्यकाल उलगडत, महावीर, बुद्धांच्या अहिंसेचा संदेश देऊन, भारतीय स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या पाच हजार वर्षांचा इतिहास "सदी की पुकार' या नृत्यनाटिकेद्वारे उलगडला.

Updated: Nov 1, 2011, 01:26 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक


हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीचा वेध घेत राम, कृष्णांचा कार्यकाल उलगडत, महावीर, बुद्धांच्या अहिंसेचा संदेश देऊन, भारतीय स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या पाच हजार वर्षांचा इतिहास "सदी की पुकार' या नृत्यनाटिकेद्वारे उलगडला. निमित्त होते युवक बिरादरी आयोजित गोदावरी मिलन अभियानाच्या उद्‌घाटनाचे. भारतातील विविध प्रांतांबरोबरच शेजारच्या देशांतील युवकांमध्ये परस्परप्रेम आणि सद्‌भावना वाढीस लागण्याच्या उद्देशाने नाशिक-नगर-औरंगाबाद या गोदाकाठावरील जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविले जात आहे. यात, जम्मू-काश्‍मीर आणि ईशान्य भारतातील आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, मिझोराम या सप्तभगिनी प्रदेशांसह पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरिया, बांगलादेश, श्रीलंका, बलुचिस्तान, येमेन, लाओस, केनिया या देशांतील सुमारे दीडशे युवक-युवती सहभागी झाले आहेत. नाशिकसह गोदावरीकाठच्या नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये जाऊन ते महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून घेणार आहेत.

 

दरम्यान, पंचवटीतील निमाणी बंगला येथील औपचारिक कार्यक्रमात युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गोदावरी मिलन अभियानाचे आज उद्‌घाटन झाले. वसुंधरा बचाओ संकल्पनेने प्रेरित असलेल्या या अभियानाचे युवक बिरादरी आणि राजाराम पानगव्हाणे यांनी संयोजन केले. वनाधिपती विनायकदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. कैलास मठाचे अधिपती संविदानंद सरस्वती, "गांवकरी'चे संपादक वंदन पोतनीस, युवक बिरादरीचे आशुतोष शिर्के यांच्यासह डॉ. शोभा बच्छाव, वत्सला खैरे, कल्पना पांडे, निर्मला खरडे, आकाश छाजेड, बी. डी. गांगुर्डे, मुरलीधर पाटील आदी प्रमुख पाहुणे होते.

 

श्री. पाटील म्हणाले, की भारतीयांना आपल्या देशावर पकड ठेवायची असेल, तर आपल्या देशातील विविध प्रदेश आणि तेथील लोक समजून घेऊन एकत्र आले पाहिजे. हेच काम युवक बिरादरीसारख्या विधायक अभियानाद्वारे होत असून, त्यामुळे देशाचा एकसंधपणा कायम राहण्यास मदत होत आहे. धार्मिक कार्यक्रमात कावडीद्वारे पाणी आणून गंगा-गोदावरीचे मिलन घडविण्याची रीत आहे. मात्र, आजच्या कार्यक्रमात सप्तभगिनी प्रदेशातील सप्तनद्यांचे पाणी आणून गोदावरी मिलनाच्या रूपाने राष्ट्रीय एकात्मता जोपासली गेली. हे सप्तनद्यांचे पाणी म्हणजे एकविसाव्या शतकातील नवीन कावडी आहेत.

 

युवक बिरादरीची भूमिका स्पष्ट करताना पद्मश्री शहा म्हणाले, की सप्तभगिनी संबोधल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांना उर्वरित भारताने आपलेसे करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच युवक बिरादरीतर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. नव्या पिढीला नक्षलवाद, दहशतवाद यांसारख्या हिंसेपासून दूर ठेवत, त्यांच्यामध्ये अहिंसा आणि सद्‌भावनेचा संदेश पोचणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील विधायक काम करणाऱ्या संस्थांचा परिचय घडवून या तरुणांपर्यंत रचनात्मक कामाचा संदेश देण्याचा प्रयत्न या अभियानामार्फत होणार आहे.  श्री. पानगव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. श्री. पोतनीस आणि संविदानंद सरस्वती यांनीही मनोगत व्यक्त केले.

Tags: