मराठी पोरं हुश्शार.... दहीहंडीसाठी केलं जीवाचं रान....

‘दहीहंडीसाठी वाट्टेल ते’... हे म्हणणारा एखादा गोविंदा नाहीये... तर ती आहे मुंबईतली मराठमोळी ‘साद एण्टरटेन्मेंट’ची टीम..

Updated: Dec 18, 2012, 11:12 AM IST

www.24taas.com, मुंबई
‘दहीहंडीसाठी वाट्टेल ते’... हे म्हणणारा एखादा गोविंदा नाहीये... तर ती आहे मुंबईतली मराठमोळी ‘साद एण्टरटेन्मेंट’ची टीम... ‘दहीहंडीसाठी वाट्टेल ते’... असं म्हणत, जिवाची बाजी लावणाऱ्या गोविंदाला लघुपटाच्या रूपाने सर्वांसमोर आणणाऱ्या या टीमच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गोविंदा हा तसा सर्वसामान्यच...
मात्र त्यालाही प्रसिद्धीच्या झोतात आणणाऱ्या आणि ग्लॅमर प्राप्त करून देणाऱ्या ‘साद एण्टरटेन्मेंटच्या’ या मराठमोळ्या तरूणांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि त्यांच्या याच मेहनतीचं खऱ्या अर्थाने चीज झालं आहे. पहिल्या स्मिता पाटील लघुपट स्पर्धेत ‘दहीहंडीसाठी वाट्टेल ते’ या लघुपटाने बाजी मारली आहे. स्पर्धेतील ३५ लघुपटांमधून सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान ‘दहीहंडीसाठी वाट्टेल ते’ या लघुपटाने मिळविला.
रौनक फडणीस यांना सर्वोत्कृष्ट एडिटिंगचे पहिल्या क्रमांकाचे तर सिद्धेश सावंत यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ‘आम्ही सगळे जोगेश्वरीला राहणारे आहोत. त्यामुळे दहीहंडी हा विषय आमच्या जिव्हाळ्याचा आहे. आमचे सगळे प्रयत्न पणाला लावून आम्ही हा विषय मांडला आहे. कदाचित त्यामुळेच एफटीआयआय सारख्या नामांकित संस्थेतून आलेल्या पाच लघुपटांपेक्षाही आमचा लघुपट अधिक आवडला असेल,’ असे मत लघुपटाचे दिग्दर्शक सिद्धेश सावंत यांनी व्यक्त केले.