`गानकोकिळे`च्या आवाजातलं सुफी संगीत!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधूर कंठातून गाण्यांचे विविध प्रकार तुम्ही आत्तापर्यंत ऐकले असतील... पण, या कोकिळेनं पहिल्यांदाच सुफी संगीताला आपला आवाज दिलाय... त्यामुळे लतादीदींच्या आवाजातून तुम्हाला सुफी संगीत ऐकायला मिळणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 8, 2014, 04:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधूर कंठातून गाण्यांचे विविध प्रकार तुम्ही आत्तापर्यंत ऐकले असतील... पण, या कोकिळेनं पहिल्यांदाच सुफी संगीताला आपला आवाज दिलाय... त्यामुळे लतादीदींच्या आवाजातून तुम्हाला सुफी संगीत ऐकायला मिळणार आहे.
लता मंगेशकर यांचा भाजा बैजू आपला पहिला वहिला म्युझिक अल्बम घेऊन प्रेक्षकांसमोर हजर झालाय. त्याच्याच अल्बममध्ये सूफी गाण्याला लतादीदींनी आपला आवाज दिलाय. हिच या अल्बमची खासियत ठरतेय. हा अल्बम नुकताच लॉन्च करण्यात आलाय.
बैजूनं आपल्या आजोबांच्या – दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हा अल्बम काढलाय, असं सांगितलं जातंय. ‘बैजू खूप चांगला गातो हे मला माहीत आहे. पण, त्यानं नेहमीच माझ्या छोट्या बहिणीसाठी – मीनासाठी गाणे गायलेत. मीनानंच बैजूला सूफी अल्बम काढण्याची कल्पना सुचवली होती’ असं लतादीदींनी म्हटलंय.
‘मी देशभर सूफी गाणी ऐकली... त्यांच्या रियाज केला... पण, गुलाम अली साहेबांसारखा दुसरा कुणी आढळला नाही. मी केवळ काही गाणे थोड्या वेगळ्या पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न केलाय. लतादीदींनाही हे गाणे आवडले आणि यामध्ये गाण्यासाठी त्यांनी होकार दिला’ असं यावेळी बैजूनं म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.