www.24taas.com, संतोष लोखंडे, बुलडाणा
दुष्काळात राज्य होरपळत असताना काही जण आपल्या भन्नाट कल्पनेद्वारे अनेकांची तहान भागवण्याचा प्रयत्न करतायत... बुलडाण्यातला एक तरुण रखरखत्या उन्हात अनोख्या प्रयोगाद्वारे लोकांची तहान भागवतोय. थंड पाण्याचं एटीएम... रखरखत्या उन्हात प्रत्येकाची तहान भागवणारं...बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावमधल्या सुशील माळोकर या बीई इलेक्ट्रीकल असलेल्या तरुणाच्या आयडियाची ही कल्पना....
सुशील माळोकार आणि दीपक चोपडे या दोघा मित्रांनी एक रुपयात एक ग्लास थंडगार पाणी उपलब्ध करून देणारं एटीएम मशीन तयार केलंय. सुशीलनं यासाठी एका मालवाहक गाडीचा वापर केलाय. त्यामध्ये एक हजार लिटर पाण्याची टाकी बसवलीय. त्या टाकीत थंड पाणी भरलं जातं. जे जवळपास 24 ते 36 तास थंड राहतं. त्या टाकीमध्येच त्यानं कॉईन बॉक्स बसवला. त्यात एक रुपयाचं नाणं टाकल्यावर नळामधून थंड पाणी मिळतं.
अशा प्रकारे या टाकीला चार नळ बसवण्यात आलेत. पाण्याप्रमाणंच सुशीलनं सरबताचीही या गाडीवर सोय केलीय. या मशीनसाठी सुशीलला मालवाहक गाडी सोडून पन्नास हजार रुपये खर्च आलाय. आता त्यानं मशीनच्या पेटंटसाठी अर्ज केलाय. ते मिळाल्यावर मागणीनुसार ना नफा, ना तोटा या धर्तीवर हे मशीन तयार करून देणार असल्याचा त्याचा मानस आहे.