www.24taas.com, औरंगाबाद
मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीय. टँकरही पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत. अशा भीषण परिस्थितीत दौलताबाद ग्रामपंचायतीने जलफेरभरणाचा आगळावेगळा उपक्रम राबवून दुष्काळावर मात केलीय. जागतिक जल दिनी ‘झी २४ तास’चा हा खास रिपोर्ट...
औरंगाबादपासून अवघ्या १५ किलोमीटरवर असलेलं हे दौलताबाद गाव... देवगिरी किल्ल्यामुळं पर्यटकांचा कायमचा राबता असलेलं गाव.. जवळपास आठ हजार लोकवस्तीचं हे गाव... मात्र, मराठवाड्यावर कोसळलेल्या दुष्काळासारख्या संकटातून हे गावही सुटलेलं नाही. गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या एकमेव विहिरीचं पाणी यंदा तर जानेवारीतच आटू लागलं. दिवसभरातून फक्त तासभर मोटार सुरु राहू लागली.. त्यातच टँकरनं पाणीपुरवठा करण्याची मागणीही होऊ लागली. या सार्वजनिक विहीरीपासून काही अंतरावर पुरातन मोमबत्ता तलाव आहे. हेच पाणी उपसा करुन विहीरीत टाकण्याचा विचार सुरु झाला. मात्र, लोडशेडिंगमुळं मोटार किती वेळ वापरता येईल याचा नेम नव्हता.. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन हवेच्या दाबावर आधारीत प्रयोग करण्याची कल्पना ग्रामविकास अधिकाऱ्यांना सुचली. कमी खर्चाची ही कल्पना साऱ्यांना आवडली आणि त्याचा प्रयोग सुरु झाला.
सायफन पद्धतीचा म्हणजेच हवेच्या दाबाने हे पाणी जवळच्या नाल्याद्वारे विहिरीजवळ आणण्यात आलं. विहीरीजवठळ दीडशे फूट लांब आणि १५ फूट खोल चर खोदण्यात आला. त्यात तलावाचे पाणी साचतंय. शिवाय हे पाणी जमिनीत झिरपू लागल्याने विहिरीतही नैसर्गिकरीत्या पाण्याचे स्त्रोत निर्माण झालेत. अवघ्या दोन हजार रुपयांत साकारलेल्या या प्रयोगामुळं ग्रामस्थांना दिवसाआड पुरेसं पाणी मिळू लागलंय.
दुष्काळावर रडत न बसता दौलताबाद ग्रामपंचायतीने स्वतःच दुष्काळावर मात केलीय. तहान लागल्यावर विहीर खोदण्याऐवजी विहिरीत कायमस्वरुपी पाणी कसं राहील, याचा विचार केला. एका साध्या तंत्रानं टँकर, पैसा, वेळ साऱ्याची बचत झाली आणि आटलेल्या विहिरीला पाझर फुटला. जागतिक जलदिनी इतर गावांनीही या गावाचा आदर्श घेतल्यास दुष्काळाला हरवणं सहज शक्य आहे.