विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये पोलिसांच्या असंवेदनशिलतेचा आणि बेजबाबदारपणाचा प्रत्यय आलाय. या दोन पोलीस अधिका-यांच्या बोलण्यात नसलेली एकवाक्यता बाळू चंदनशिवे या तरुणावर झालेला अन्याय सांगण्यासाठी पुरेशी आहे.
औरंगाबादमधल्या एम.आय.टी. कॉलेज रोडवर एसीपी विजय पवार यांच्या तवेरा गाडीचा आणि बाळू चंदनशिवे या तरूणाच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात बाळू चंदनशिवेचा गुडघा फ्रॅक्चर झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी थेट मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेऊन तिथंच बसवून ठेवलं. एवढंच नव्हे तर पीडित तरुणाला पोलिसी खाक्या दाखवत त्याला चक्क बेड्या ठोकल्या.
एवढ्यावरच पोलीस थांबले नाही तर नुकसान भरपाई म्हणून सुरुवातीला 50 हजारांची, त्यानंतर 25 हजारांची आणि त्यावर सेटलमेंट होत नव्हती त्यामुळे 13 हजारांची मागणी केली... नुकसान भरपाई दिली तरच बाळू आणि गाडीला सोडलं जाईल, असा दम त्याला देण्यात आला.
औरंगाबादच्या या मुकूंदवाडी परिसरात एकही दिवस असा नाही ज्या दिवशी घरफोडी किंवा मंगळसुत्र चोरी झाली नाही. अनेक प्रयत्न करूनही पोलिसांना हे गुन्हेगार सापडू शकलेले नाहीत. मात्र बाळूसारख्या निरपराधाला स्वत:ची चूक लपवण्यासाठी दमदाटी करून बेड्या ठोकताना या पोलीस महाशयांनी जराही विचार केला नाही.