वेळ रात्री ११.०० वाजता; ... आणि सरकारी कर्मचारी ऑफिसमध्ये?

मांजर डोळे मिटून दूध पिते... कारण, डोळे मिटल्यावर आपल्याला कोणी बघणार नाही असा तिचा बापडीचा समज असतो. धुळे महापालिकेतही सध्या असाच काहीसा प्रकार सुरु आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 5, 2013, 03:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
मांजर डोळे मिटून दूध पिते... कारण, डोळे मिटल्यावर आपल्याला कोणी बघणार नाही असा तिचा बापडीचा समज असतो. धुळे महापालिकेतही सध्या असाच काहीसा प्रकार सुरु आहे.
धुळे महापालिकेतलं चित्र तुम्ही पाहिलंत तर तुम्हालाही याची खात्री पटेल. महापालिकेच्या कार्यालयात अतिशय कार्यक्षमतेनं काही कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त दिसले आणि तेदेखील घड्याळात रात्रीचे ११ वाजले असताना... एरव्ही ऑफीस टाईममध्येही कामात चालढकल करणारे हे कर्मचारी रात्रीचा दिवस करून कोणतंही लोकहिताचं काम करत नव्हते... तर चक्क ठेकेदारांची बिलं नियमबाह्यरितीनं काढता यावीत, म्हणून हा सारा खटाटोप सुरू होता.
धुळे महापालिकेचं १५ डिसेंबरला मतदान आहे. त्यासाठी शहरात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळेच आयुक्त दौलत पठाण यांनी ठेकेदारांची बिलं काढता येणार नाहीत, अशी पाटी आपल्या कार्यालयाबाहेर लावलीय... पण ते फक्त दाखवण्यापुरतं... त्यांच्याच सूचनेवरून हे कर्मचारी रात्रीच्या वेळी चोरट्यानं लेखाविभागात येऊन ३५ ठेकेदारांची बिलं काढताना दिसली.
कर्मचारी संघटनेच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीला आलाय. रात्रीच्या वेळी चोरीछुपे बिलं काढणाऱ्या या कारकुनांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं आणि या प्रकाराचा पर्दाफाश झाला.

व्हिडिओ पाहा :-

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.