www.24taas.com, मुंबई
बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलवर उभारलं जावं, ही भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नसून ती संदीप देशपांडे यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं स्पष्टीकरण मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी दिलंय.
‘बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत संदीप देशपांडे यांनी वैयक्तिक भूमिका मांडली होती. मुळात मनसेचा पुतळे उभारण्यालाच विरोध आहे. पुतळे उभारणे म्हणजे स्मारक नव्हे... आणि मनसेची भूमिका ही राज ठाकरेच ठरवतात इतर कुणीही नाही’ असं स्पष्टीकरण देतानाच ‘बाळासाहेबांचं स्मारक हे स्मारक लोकोपयोगी असावं… बाळासाहेबांचं स्मारक हे जागतिक ग्रंथालय असावं’ अशी मनसेची इच्छा असल्याचंही शिदोरे यांनी म्हटलंय.
‘शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्यासाठी आमचा विरोध नाही. पण, बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी दादरची जागा अपुरी आहे. बाळासाहेब हे राजकारणी आणि समाजकारणीही होते. त्यांच्यासारख्या थोर एव्हढ्या थोर व्यक्तिमत्त्वाला साजेसं स्मारक उभारण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये मोठी जागा नाही. पण, इंदू मिलमध्ये असं मोठं स्मारक उभारलं जाऊ शकतं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य असं स्मारक दादरमध्ये नाही तर इंदू मिलमध्ये उभारलं जावं’ अशी मागणी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली होती. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकाचा वाद आणखीन वेगळंच रुप घेणार असं दिसून येत होतं. मात्र, मनसेनं माघार घेत ही पक्षाची भूमिका नव्हतीच असं स्पष्टीकरण आता दिलंय.