मियाँदाद यांनी मागितली बाळासाहेबांसाठी दुवाँ!

पाकिस्तानचे क्रिकेटर जावेद मियाँदाद यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती बरी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या आहे. त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून आपण अल्लाकडे दुवा मागितली असल्याचं मियाँदाद यांनी सांगितले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 16, 2012, 07:55 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानचे क्रिकेटर जावेद मियाँदाद यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती बरी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या आहे. त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून आपण अल्लाकडे दुवा मागितली असल्याचं मियाँदाद यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचे क्रिकेटर मियाँदाद भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते.
जावेद मियाँदाद यांना बाळासाहेबांच्या प्रकृतीसंबंधी कळताच ते अस्वस्थ झाले, त्यांनी बाळासाहेबांची प्रकृती बरी व्हावी यासाठी अल्लाकडे दुवा मागितली. यावेळी ते म्हणाले, बाळासाहेब आणि माझे चांगले संबंध आहे. त्यांच्याशी नेहमी बोलणं व्हायचं. मी क्रिकेट खेळायचो तेव्हाही माझ्या चांगल्या खेळीबद्दल त्यांनी नेहमी माझी प्रशंसा केली आहे. माणूस म्हणून आम्ही सदैव एकामेकांबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. ते ज्या पद्धतीने आजारी आहेत, त्यांचे आजारपण दूर व्हावे. माझे ते चांगले मित्र आहेत. एक मित्र म्हणून मी अल्लाकडे दुवा करतो की त्यांनी लवकर बरं कर. जीवन मरण हे ईश्वराच्या हातात आहे, पण माझ्या सदिच्छा आणि प्रार्थना सदैव बाळासाहेबांसाठी आहेत, असेही मियाँदाद यांनी सांगितले.
मी जेव्हा बाळासाहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी माझे चांगले स्वागत केले होते. त्यांनी माझ्याशी चांगल्या गप्पा मारल्या होत्या. त्यामुळे तेव्हा वाटतच नव्हतं की पेपरात किंवा त्यांच्याबद्दल जे लिहून येते ते बाळासाहेब हे आहेत. त्यांनी खूप खुल्या मनाने माझ्याशी गप्पा मारल्या होत्या. आमची चांगली मैत्री आहे, यात मैत्रीत राजकारण किंवा सीमेचा वाद कधी आला नाही. क्रिकेट खेळाताना आम्ही कधी विचार केला नाही, की हा हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन असा आम्ही कधी भेद केला नाही. त्यामुळे बाळासाहेबांना मी भेटलो, तेव्हा तसाच भाव आमच्या मनात होता. त्यावेळी मी मुस्लिम आहे, ते हिंदू आहेत असा कधी विचारही मनाला शिवला नव्हता.