शिवसेनाप्रमुख बाळासाहेबच कायम - उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची शब्दापलीकडील नात्याची वीण त्यांच्या निधनानंतरही घट्ट असल्याने त्यांच्या पश्चातही शिवसेनाप्रमुख या पदावर बाळासाहेबच कायम राहणार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. लाखो शिवसैनिकांची भावना लक्षात घेता आपण त्यांची जागा घेणार नाही. कार्यकारी अध्यक्षपदावरच राहू. पुढील घोडदौड सुरू ठेवण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 2, 2012, 09:50 AM IST

www.24taas.com,मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची शब्दापलीकडील नात्याची वीण त्यांच्या निधनानंतरही घट्ट असल्याने त्यांच्या पश्चातही शिवसेनाप्रमुख या पदावर बाळासाहेबच कायम राहणार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
लाखो शिवसैनिकांची भावना लक्षात घेता आपण त्यांची जागा घेणार नाही. कार्यकारी अध्यक्षपदावरच राहू. पुढील घोडदौड सुरू ठेवण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमनच सामनातून मुलाखत दिलीय. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत उद्धव यांची घेतली.
मी हिमतीने सांगतोय, शोक आवरा. रडू नका. आता लढायला उभे राहा. लढाई मोठी आहे आणि ती लढाई बाळासाहेबांनी दाखविलेला मार्ग, त्यांनी दिलेली हिंमत आणि विचार या जोरावरच आपल्याला जिंकायची आहे आणि ती आपण जिंकणारच. हा आत्मविश्वास माझ्यामध्ये नक्कीच आहे. मी माझं काम पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवणार आहे. बाळासाहेबांनी जे विचार दिले आहेत, जी कामे आखून दिलेली आहेत त्यातून मी एक तसूभरही मागे हटणार नाही. किंबहुना मी असं म्हणेन की, तेवढी जिद्द, तेवढी हिंमत, तेवढी बुद्धी त्यांनी मला दिलेली आहे आणि त्यांचं एकही स्वप्न मी अपूर्ण ठेवणार नाही, असा उद्धव यांनी यावेळी निर्धार केला.
शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनाप्रमुख आहेत. आता त्यांच्या निधनानंतर शिवसेनाप्रमुख म्हणून कोणाची निवड होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचेही लक्ष लागले होते. मात्र, उद्धव यांनी यावर पडदा पाडला आहे.
बाळासाहेबांनी कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची नेमणूक केली असल्याने लोकशाहीतील परंपरेनुसार उद्धव यांच्याकडेच शिवसेनेची सारी सूत्रे आहेत.पण त्याच वेळी शिवसेनाप्रमुख या पदावर बाळासाहेब यांचे नाव कायम राहिल. त्यांची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केल्याने उद्धव हे कार्यकारी अध्यक्षच राहणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९७५ च्या आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. त्याचा फटका शिवसेनेला १९७८ च्या निवडणुकीत बसून पराभवाला सामोरे जावे लागले. त्याची जबाबदारी स्वीकारून बाळासाहेबांनी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर घराणेशाहीचा आरोप झाल्यावर १९९१ मध्ये शिवसेनाप्रमुखपद सोडण्याची तयारी दर्शवली होती; पण शिवसैनिकांनी केलेल्या आग्रहामुळे बाळासाहेबच शिवसेनाप्रमुख पदावर कायम राहिले होते.