www.24taas.com, मुंबई
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राचे संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलीये. बाळासाहेब ठाकरेंचे नाव संस्थापक संपादक म्हणून टाकण्यात आलयं. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव यांच्यावर आणखी एक जबाबदारी पडलीये. सामनाच्या स्थापनेपासून बाळासाहेब संपादक होते.
उद्धव ठाकरे यांनी सामना या मराठी आणि दोपहर का सामना या हिंदी वृत्तपत्राच्या संपादकपदाची जबाबादारी स्वीकारली आहे. सोमवारपर्यंत सामना या वृत्तपत्रावर संपादक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव होते. परंतु, आता त्यांचे नाव त्याच ठिकाणी संस्थापक संपादक बाळ ठाकरे असे देण्यात आले आहे.
संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव शेवटच्या पानावर देण्यात आले आहे. मुखपृष्ठावर आपले नाव नको अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनीच व्यक्त केली आहे.
मराठी माणसापर्यंत आपला आवाज पोहविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी २३ जानेवारी १९८८ रोजी मराठीमध्ये सामना हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर हिंदी भाषकांना आकृष्ट करण्यासाठी त्यांनी एका महिन्यानंतर म्हणजे २३ फेब्रुवारी १९८८ रोजी दोपहर का सामना सुरू केला.