www.24taas.com, मुंबई
बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेचे संपूर्ण काम आता उद्धव ठाकरे हातात घेतील असा विश्वास शिवसेना नेते मनोहर जोशींनी व्यक्त केलाय. उद्धव ठाकरे पक्षकामात स्वतःला झोकून पक्ष वाढवतील, पक्ष पुढे नेतील असंही मनोहर जोशींनी सांगितलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कवर जनसागर लोटला होता. बाळासाहेबांच्या आठवणींनी हेलावलेल्या लाखो शिवसैनिकांमच्या मनात प्रश्नांचे काहूर माले होते. शिवसेनाप्रमुखांनंतर काय? मराठी माणसांचं काय होणार? राज आणि उद्धव एकत्र येणार का? अशी चर्चा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांमध्ये सुरू होती.
अस्थिकलश घेतांना उद्धव यांना झाले अश्रू अनावर
बाळासाहेबांच्या अस्थीकलशासाठी ठाकरे कुटुंबीय शिवाजीपार्कवर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेतेही उपस्थित होते.. आजही उद्धव ठाकरेंना अश्रू अनावर झाले आणि बाळासाहेबांच्या आठवणीत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शिवसेनाप्रमुखांवर काल शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थित लाखो जनसमुदायाला अश्रू अनावर झाले होते.
बाळासाहेबांच्या अस्थीचे मिळणार सैनिकांना दर्शन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थीकलशाचं राज्यातल्या सर्व शिवसैनिकांना दर्शन घेता येणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिवसेनाप्रमुखांचा अस्थीकलश नेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या जिल्हासंपर्कप्रमुखांकडे हे अस्थीकलश सोपवण्यात येणार आहे. 23 नोव्हेंबरपर्यंत अस्थीकलशाचं दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर अस्थीकलशांचं नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे.