www.24taas.com, मुंबई
मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी लोक मंदिरात जातात. भक्तिभावाने देवाकडे काही मागितलं तर इच्छा पूर्ण होते, असं आपल्याला वाटतं. मंदिरात गेल्यामुळे मनाला शांतता मिळते, उभारी येते.मंदिरात गेल्यामुळे पुण्य मिळतं. पण बऱ्याच जणांना धावपळीच्या आयुष्यात देवळात जाऊन देवाचं दर्शन घेणं जमत नाही, त्यांनी काय करावं?
देवळात जाऊन देवाचं दर्शन घेणं शक्य होत नसेल, तरी एक सोपा उपाय आहे. जाता-येता रस्त्यात कुठे ना कुठे तरी मंदिर दिसतं. किंवा मंदिराचा कळस तरी दृष्टीस पडतो. या कळसाकडे पाहून मनोभावे नमस्कार करावा. ‘शिखर दर्शनम्, पाप नाशम्’ असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. म्हणजेच मंदिराच्या शिखराचं जरी दर्शन घेतलं तरी देवाचं दर्शन घेतल्यासारखंच पुण्य मिळतं.
मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो. देवाचं आपल्यावर लक्ष असल्याची भावना निर्माण होते. रस्त्यात एखादं छोटं मंदिर जरी दिसलं तरी तेथे मन एकाग्र करून काही क्षण देवाचं नामस्मरण करावं. यामुळे चित्तवृत्ती शांत होतात आणि काम करण्याचा उत्साह राहातो.