www.24taas.com, मुंबई
मंदिरात गेल्यावर आपण देवाचं दर्शन घेतल्यावर पहिली क्रिया जी करतो, ती म्हणजे प्रदक्षिणा. प्रत्येक देवाच्या मूर्तीभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. शिवशंकराला मात्र अर्धी प्रदक्षिणा घातली जाते. आपण आपल्या इच्छेनुसार देवाला प्रदक्षिणा घालतो. पण प्रत्येक देवाभोवती किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे काही नियम आहेत.
मंदिरात जेव्हा पूजाअर्चा केली जाते, शंखनाद केला जातो, घंटानाद होतो आणि मनात पवित्र विचार करून माणूस देवासमोर उभा राहातो तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मूर्तीच्या कक्षेतील हिच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी देवा भोवती प्रदक्षिणा घातली जाते. पण प्रत्येक देवतेला वाटेल तशा प्रदक्षिणा घालून ही ऊर्जा मिळत नाही. त्यासाठी ठराविक प्रदक्षिणाच घालाव्या लागतात.
गणपती आणि मारुतीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात. राम, कृष्ण अशा विष्णूच्या कुठल्याही अवताराला चार प्रदक्षिणा घालाव्यात. देवीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात. मात्र भगवान शंकराला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. शंकराला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी.
प्रदक्षिणा घालण्यासंबंधी काही नियम लक्षात ठेवावेत. प्रदक्षिणा घालताना कधीही मध्येच थांबू नये. तसंच ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे. त्य़ाच जागेवर प्रदक्षिणा संपन्न करावी. प्रदक्षिणा घालाताना कुणाशीही गप्पा मारू नयेत. यावेळी ज्या देवाला प्रदक्षिणा घालतो, त्या देवाचं ध्यान करत राहावं. कुठल्याही व्यक्तीला प्रदक्षिणेदरम्यान पाय लागू देऊ नये.