तुमचा हरवलेला मोबाईल फोन असा शोधा | शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा

तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 8, 2021, 09:16 PM IST
तुमचा हरवलेला मोबाईल फोन असा शोधा | शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा title=

जयवंत पाटील, झी 24 तास, मुंबई : मोबाईल फोन हरवल्यानंतर काय होतं?, याचा अनुभव फोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतरच येतो. तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.

हा अनुभव मी येथे यासाठी लिहितोय की फोन हरवण्यापासून ते तो पुन्हा हातात पडेपर्यंत काय काय करावं लागलं, याचा अनुभव मला आलाय. तो तुम्हाला येऊ नये ही प्रामाणिक इच्छा... मात्र, फोन हरवल्यानंतर 48 तासांच्या आत सापडला, पण त्यासाठी अनेक कसरती कराव्या लागल्या.

फोन सहसा घाईत असतांना आपण विसरतो

ऑफिसला येत असतांना टॅक्सीतून उतरत असतांना, टॅक्सीवाल्याने रस्त्याच्या मधोमध टॅक्सी उभी केली, यामुळे मागील वाहनचालकांनी कर्णकर्कश हॉर्न वाजवत रस्ता दणाणून सोडला, या घाईत मी माझा फोन टॅक्सीत विसरलो.

हे मला काही वेळाने लक्षात आलं, ऑफिसचे सीसीटीव्ही देखील चेक केले पण हातात फोन नव्हता, तेव्हा लक्षात आलं फोन टॅक्सी विसरलोय. तेव्हा दुपारचे 4 वाजले होते.

ऑफिसमध्ये फोन हरवल्याची बातमी सर्वांना कळली होती, अनेकांनी तुला याचं काहीही दु:ख नाही, असं माझा चेहरा पाहून प्रतिक्रिया देखील व्यक्त केली. पण आता फोन शोधायचा कसा याचा विचार मी करत होतो.

फाईन्ड आयफोनची मदत घेतली

यानंतर मी कम्प्युटरवर फाईन्ड आयफोनवर लॉग इन केलं. अॅपलच्या आयक्लाऊडवर मी यापूर्वी रजिस्टर केलेला आयडी आणि पासवर्ड माझ्या व्यवस्थित लक्षात होता. यानुसार मी आयक्लाऊडवर लॉग इन केलं.

सुरूवातीला काहीच दिसत नव्हतं, यावरून जरा वेळ वाटलं, आपण फोनमध्ये फाईंड माय आयफोन ऑप्शन सुरू करायला विसरलोय. त्यामुळे वाटलं, संपलं आता फोन ट्रॅकही होणार नाही.

फोनचं लोकेशन टॅक्सी जाईल तिथे दाखवत होतं

मात्र आणखी थोड्या वेळाने https://www.icloud.com/#find वर लॉग इन केलं, तेव्हा फोन कुठे आहे हे दाखवायला आयफोन फाईंडरने सुरूवात केली. तोपर्यंत ती व्यक्ती पार्ल्यात ऑर्किड हॉटेलकडे पोहोचली होती, आणि माझं ऑफिस वरळीला होतं, हे सर्व आम्ही ऑफिसमधून कम्प्यूटरवर पाहात होतो, अंतर जास्त असल्याने काहीही करू शकत नव्हतो, नंतर ही व्यक्ती दहा मिनिटात वाकोला ब्रिजजवळ पोहोचली. आम्ही फोनला रिंग करत होतो, पण कुणीही फोन रिसिव्ह करत नव्हतं.

बॅटरी संपत आली होती, पण बेल वाजत होती

फोनची बॅटरी किती शिल्लक आहे, हे देखील आयफोन फाईंडरवर दिसत होतं, यामुळे ज्या व्यक्तीजवळ हा फोन आहे. ती व्यक्ती नेमकी कुठे स्थिरावते यावर आमचं लक्ष होतं. बॅटरी फक्त 20 टक्के राहिली होती, रात्रीचे 9 वाजून 45 मिनिटं झाली होती, तेव्हा आम्ही बझर देखील वाजवला.

आणि फोन स्वीच ऑफ झाला

आयफोनने चोरलेल्या फोनच्या आपण जवळपास असलो, तर तो ओळखण्यासाठी बझरची सुविधा दिली आहे, त्याशिवाय एका मित्राचा नंबर फाईंडरमध्ये टाकला, एक नोट देखील टाकली की, हा फोन सापडला असेल तर या नंबरवर फोन करा, असं लिहण्यात आलं, हा मेसेज फोनच्या स्क्रिनवर दिसायला सुरूवात होते. यानंतर हा फोन स्टोलन मोडमध्ये शेवटी आम्ही टाकला. मात्र त्यानंतर फोन रात्रीच्या दहा वाजण्याच्या सुमारास बंद झाला.

जेथे फोन बंद झाला ते शेवटचं लोकेशन आम्हाला दिसत होतं, पण या जागेवर ही व्यक्ती सर्वात जास्त काळ असल्याने या व्यक्तीचं घर या ठिकाणीच असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर ज्या ठिकाणी हा पॉईंट दाखवण्यात आला, त्याचे प्रिन्ट स्कॅन काढून ठेवले, त्याची प्रिन्ट घेतली, आणि आयफोनचा शोध सुरू झाला.

वाकोल्यात दाखवलं शेवटचं लोकेशन

हे लोकेशन वाकोला फ्लायओव्हर, वाकोला पोलीस स्टेशनच्या बाजूला दोन बिल्डिंगच्या मागे दिसत होतं, बिल्डिंगची नावं दिसत होती, मात्र ज्या ठिकाणी पॉईंट येत होता, त्या जागेला कोणतंही नाव नव्हतं, या ठिकाणी झोपडपट्टीची छपरं दिसत होती. म्हणून आणखी अडचण वाढली. यानंतर आम्ही पोलिसांकडे साधी तक्रार देऊन टाकली, पोलिसांनी सापडला तर फोन करू असं सांगितलं. मी देखीलं 'हं चालेल, धन्यवाद' असं म्हटलं.

शोध घेणं आणखी कठीण झालं

नाईट रिपोर्टर रात्री अंधेरीला जाणार होता, म्हणून त्या गाडीनेच वाकोला पोलीस स्टेशन गाठलं, पोलिसांना सांगितलं, फोन या ठिकाणी ट्रॅक होतोय. त्यावेळी 'आपण सकाळी पाहू माणसं कमी आहेत, आणि तो झोपडपट्टीचा भाग आहे' असं उत्तर पोलिसांकडून मिळालं. मोबाईलचं शेवटचं लोकेशन वाकोला पोलीस स्टेशन 400 मीटरवर असेल.

मग एका रिक्षावाल्याकडून या भागाची माहिती घेण्यास सुरूवात केली. त्यानेही कोणता भाग कुठे जायचे रस्ते कुठे हे सांगण्यास सुरूवात केली, तोपर्यंत पहाटेचे 4 वाजले होते. रस्ते तसे लक्षात येत नव्हते, आणि आयफोन ट्रॅकरने दिलेल्या प्रिन्टवरील नकाशा रिक्षावाल्याला व्यवस्थित लक्षात येत नव्हता, म्हणून नाईट रिपोर्टरच्या गाडीने मी नंतर घरी निघून गेलो.

दुसरा दिवस उजाडला

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा लोकलने नऊ वाजता वाकोल्याला पोहोचलो. रात्री पाहिलेली ठिकाणं सकाळी पुन्हा व्यवस्थित पाहिली, बिल्डिंगची नावं वाचणे, या एरियाला काय म्हणतात, त्या एरियाला काय म्हणतात असं धुंडाळत राहिलो, ठिकाणांची नावं लक्षात ठेवत होतो, का माहित नाही, पण उगाच.

शेवटी एका झोपडपट्टीत गेलो, अरूंद बोळ, मोजून दोन फुटाचा रस्ता आणि वळण रस्ता पूर्ण जवळ गेल्याशिवाय काहीही दिसत नव्हतं. फोनचा शोध घेतांना या भागात लोकं कशी राहतात? हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडत होता.

झोपडपट्टीतील लोक मात्र 'काय काम आहे?' असं विचारत होते, 'मैं मेरा फोन खोज रहा हूँ' असं त्यांना सांगितल्यावर ते झोपडपट्टीची सर्व माहिती देत होते. कोणता टॅक्सी ड्रायव्हर कसा दिसतो, त्याची गाडी सॅन्ट्रो आहे, की मारूती हे देखील ते सांगत होते. अखेर झोपड़पट्टीत एका बाजूला नाला दिसला, दुसरीकडे एअरपोर्टची धावपट्टी...

एका ठिकाणी म्हशींचा गोठा होता, तिथे म्हशी राखणारा माणूस खूप चांगली मदत करत होता, त्याने झोपडपट्टीचे चारही कोपरे मला दाखवले, मला यासाठी तीन तासाच्या वर वेळ लागला. ऑफिसची वेळ होत होती, हातात मोबाईल नसल्याने, दुसऱ्याला वेळ विचारून पुन्हा ऑफिसला निघालो.

ऑफिसमध्ये आल्यानंतर पुन्हा आयफोन फाईंडर ओपन केला, आपण कुठे गेलो होतो, आणि हा पॉईंट कुठे आहे, हे पुन्हा एकदा पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, आपण बाजूच्या लेनमध्ये गेलो, त्यामुळे लोकेशन सापडलं नाही, तेव्हा व्यवस्थित पाहिल्यावर लक्षात आलं, 'अंकुर सोसायटी' हे नावं मी वाचलं होतं आणि ती सोसायटी पाहिल्याचं लक्षात आलं. त्यामागे एक बिल्डिंग आणि तिथल्या झोपडपट्टीत लोकेशन, एकदम व्यवस्थित लक्षात आलं.

तिसऱ्या दिवशीही शोध सुरूच

तिसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी अंकूर सोसायटीच्या मागे गेलो आणि तिच्या मागे आणखी एक बिल्डिंग आणि अरूंद रस्त्यांची आणखी एक झोपडपट्टी, एक केबलवाला भेटला, एक इस्त्रीवालाही होता. ते गावाकडील मंडळींसारखं सर्व टॅक्सीवाल्यांचा बायोडेटा सांगत होते. कदाचित बिल्डिंगवाल्यांनी ही माहिती दिली, नसती एवढी 'चोपडी' त्यांच्याजवळ होती.

शेवटी ठिकाण गाठलं

तेव्हा त्याला सांगितलं फोन येथे ट्रॅक करतोय आणि तो टॅक्सीवाला असावा. मी वर्णन सांगितलं, तेव्हा या भागात दोन टॅक्सीवाले असल्याचं त्यांनी सांगितलं, पण तुम्ही वर्णन सांगतायत तसा एक जण आहे. यानंतर 'चलो दिखाता हूँ', असं सांगत त्याने 'समझलो आप ठिकाने पे पोहोच गए', असं म्हणत त्याने एका घराचं दार लांबूनच दाखवलं, घराच्या दारावर एक नाव लिहलं होतं, ते जरा लक्षात ठेवलं, पुन्हा त्या अरूंद रस्त्यातून बाहेर आलो.

बाहेर आल्यावर केबलवाला आणि इस्त्रीवाला म्हणाला, 'आप लेफ्ट साईड में जाओ, एक टॅक्सीवाला जा रहा है, जल्दी जाओ', मी तसाच लेफ्ट साईडला वळलो, एक टॅक्सीवाला मागून दिसला, तो वाकोला ब्रिजजवळ सर्व्हिसरोडच्या खाली, पार्क केलेल्या टॅक्सीजवळ जात होता, मी ज्या टॅक्सीत फोन विसरलो होतो, त्या टॅक्सीच्या मागच्या सीटवरून एका बाजूने त्या टॅक्सीवाल्याला पाहिलं होतं.

ओळख पटली पण पटवणार कसं?

तो टॅक्सीवाला त्याच्या टॅक्सीपाशी पोहचला. तो सीटवर बसल्यावर त्याला मी टॅक्सीत मागच्या सीटवरून डोकावून पाहिलं, तोच असल्याचं स्पष्ट होत होतं. पण, कसं सांगणार असा प्रश्न पडला? टॅक्सीचं इन्टेरिअर, सीटची रंगसंगती मी नेहमी उत्सुकतेने पाहत असतो, इन्टेरिअर यापूर्वी पाहिल्याचं लक्षात आलं.

मी त्याला विचारलं, 'आप को फोन मिला है, अगर मिला है तो दे दो, आप को कुछ काम का नही है, इस का ट्रॅकिंग बहोत स्ट्राँग है, (एवढं बोलून मी बोलणं थांबवलं, कारण हे त्या म्हाताऱ्या माणसाला कळत असेल असं कशावरून?.)

एवढं बोलल्यावर ते सरळ म्हणाले, 'आप का नंबर दे दो, मिल गया तो आप को फोन कर देंगे', मोबाईल बंद असल्याने त्या माणसाला मी ऑफिसचा लॅण्डलाईन नंबर दिला, आणि माझं व्हिजिटिंग कार्ड, यावर ते टॅक्सीवाले गृहस्थ म्हणाले, 'पता भी है ना इस पर', यावरून कळलं यांना फोनमधील जास्त कळत नसावं.

शेवटी टॅक्सीवाल्या गृहस्थांना मी नाव विचारलं 'आप का नाम क्या है', ते दचकले, थोडे थरथरतही होते, त्यांनी नाव सांगितलं, त्यांनी तेच नाव सांगितलं, जे मी झोपडपट्टीत दारावर काही मिनिटांपूर्वी वाचलं होतं. यानंतर मी त्यांना सांगितलं, 'उधर झोपड़पट्टी में पॉईंट दिखा रहा है, मै उधर जा के आता हूँ', असं सांगून मी निघून आलो.

पुन्हा इस्त्रीवाल्याच्या दुकानावर आलो, त्यांना सांगितलं की, मी त्यांना ओळखलंय, पण अजून त्यांना बोललो नाही, यानंतर झोपडपट्टीतल्या तीन-चार जणांनी सांगितलं, 'हम उनको समझाते है, शायद डर गए होंगे', मी यावर सांगितलं, 'मी फोन टॅक्सीत विसरलोय, कुणी चोरलेला नाही', ते त्यांना पटलं.

पुन्हा वरळीहून 'बॅक टू वाकोला'

पुन्हा ऑफिसला आलो, तर समजलं माझा फोन सापडलाय, लॅण्डलाईनवर तसा फोन आलाय. फोन घ्यायला मला बोलवलंय, एक नंबरही देण्यात आलाय, पुन्हा वरळीहून 'बॅक टू वाकोला', माझ्याकडे फोन नसल्याने संबंधिताचा नंबर कागदावर लिहिला होता, पुन्हा झोपडपट्टीच्या चौकात गेलो, अखेर एका किराणा दुकादाराने त्यांच्या मोबाईलवरून फोन लावला, तेव्हा हॉटेल ग्रॅड हयातजवळ असल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं, दुकानवाल्याने बाईक काढली, (कारण सर्वांशी आता चांगलीच मैत्री झाली होती) बाईकने आम्ही त्या व्यक्तीजवळ पोहोचलो.

सिम काढून घेण्यात आलं होतं

तो टॅक्सीवाल्याचा मुलगा होता, टॅक्सी पॅसेंजरने सिम काढून घेतलंय, असं तो सांगत होता, मुलगा सुशिक्षित दिसत होता, पण तू सुसंस्कृत नसल्याचं माझ्याबरोबर आलेल्या दुकानवाल्याने त्याला सुनावलं. कारण त्याने सिम काढून ट्रॅकर तोडण्याचा प्रयत्न केला असावा, असं दुकानदार म्हणत होता, 'तुझ्या बाबांना फोनमधील काही कळत नसेल, तुला तर कळतं ना, मग पहिल्याच दिवशी परत का केला नाही', असं दुकानदाराने त्या मुलाला आणखी एकदा सुनावलं.

अखेर फोन ताब्यात घेतला

मी खूप थकलो होतो, म्हणून मी जास्त बोलणं टाळलं, मी फोन ताब्यात घेतला आणि पुन्हा नव्या सिमसाठी गॅलरी गाठली, पण फोन शोधून काढल्याचा आनंद होता, तो आनंद फक्त आयफोनचा ट्रॅकर देऊ शकतो, असं स्पष्ट मत माझं झालंय. आयफोनचा ट्रॅकर अतिशय स्ट्राँग असल्याचा अनुभव मला आला. स्क्रीन लॉक देखील कुणाला क्रॅक करणं शक्य नाही, हे माझे अनुभव आहेत. सर्वात महत्त्वाचं, मला या मोबाईल शोधात टॅक्सी आणि रिक्षावाल्यांनी चांगली मदत केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.