मुंबई : राज्यात विरोधी पक्ष म्हणून वावरतांना भाजपाला सत्ताधा-यांवर आरोपांची माळ लावायची सवय होती. मात्र एकामागोमाग झालेल्या आरोपामुळे सत्तेत असलेला भाजप मनातून धास्तावला आहे. भाजपचा हनीमून पिरियड संपला असून आता त्यांना सत्तेचे चटके जाणवायला सुरूवात झालीय.
सत्कार सोहळा, कौतुक, आढावा बैठका आणि विविध निर्णयांची घोषणा यात सहा महिने कधी गेले, हे भाजपाला समजलंच नाही. मात्र हे मधुचंद्राचे दिवस संपतांना आणि निर्णयांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असतांना अचानक झालेल्या टीकेमुळे भाजप गांगरल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
भाजपवरच्या आरोपांची माळ
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर लोणीकर यांनी दुसऱ्या पत्नीची माहिती लपवल्याचा आरोप केला गेला. यानंतर थेट शिक्षणमंत्री विनोद तावड़े यांची इंजिनिअरिंगची पदवी खोटी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टेंडर न काढता २०६ कोटी खर्च केल्याचा आरोप करत विरोधक तूटुन पडले.
हे आरोप होत असतांना विरोधकांचा आवाज तीव्र होता तर मंत्र्यांचं समर्थन करतांना भाजपचा आवाज कमी पड़त असल्याचं चित्र बघायला मिळालं. हे कमी की काय म्हणून पक्ष नेतृत्व आणि पक्षातील नेत्यांवर राज पुरोहितांनी केलेल्या कथित आरोपांमुळे भाजपावर बॉम्बगोळाच पडला.
खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस हे पंकजा मुंडे यांना पाठीशी घालत असल्याबद्दल फडणवीस यांनाही थेट टीकेचे लक्ष्य करण्यात आले. ज्या सोशल मीडियाचा वापर सत्तेत येण्यासाठी भाजपने केला होता त्याच सोशल मीडियावर भाजप मंत्र्यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे आणि त्याला उत्तर देण्यात भाजप कमी पड़त असल्याचं चित्र बघायला मिळतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.