न्यू यॉर्कचं व-हाड आलं बेलापूरला...

काही लग्नांना हजेरी लावण्यात आनंद असतो. काही लग्नांना नाही गेलो तर राग येईल म्हणून जावं लागतं...मात्र काही सोहळे मनात टीकटीक करून जातात. त्याचीच ही कथा... 

Updated: Nov 29, 2016, 07:45 PM IST
न्यू यॉर्कचं व-हाड आलं बेलापूरला...  title=

गिरीश स. निकम, झी मीडिया, नवी मुंबई : काही लग्नांना हजेरी लावण्यात आनंद असतो. काही लग्नांना नाही गेलो तर राग येईल म्हणून जावं लागतं...मात्र काही सोहळे मनात टीकटीक करून जातात. त्याचीच ही कथा... 

नवी मुंबईतील स्टेट बँकेच्या झोनल ऑफीसमधील अधिकारी दामोदर पांचाळ यांच्या मुलाच्या लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण होतं. वाशीतील फोर पॉईंट हॉटेलमध्ये गेलो होतो. पांचाळ हे मूळचे रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील पण सध्या बेलापूरमध्ये स्थायीक झालेत. पांचाळ यांचा उच्चशिक्षीत एकुलता एक मुलगा प्रथमेश याने एमएस (इलेक्ट्रीकल) केलं आहे. न्यू यॉर्कमधील इंटरटेक कंपनीत कार्यरत आहे. शाळेपासून ते इंजिनिअरिंगपर्यंत आणि पुढेही शिक्षणात मेरीट कायम ठेवणा-या प्रथमेशची 2012 मध्ये चेलसीची भेट झाली. चेलसी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून पास आऊट आहे. तिची आई केरी गृहीणी, वडील बायरन होराक इंजिनिअर आहेत. तर भाऊ कॉलीनही पदवी घेऊन नोकरी करतोय. तर सांगण्याचा हेतू हा की हे प्रथमेशला चेलसी जीवनसाथी म्हणून आवडली. त्यानं बायरन कुटुंबांची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली.

 

पांचाळ कुटुंबानं अमेरिकेत येऊन आपल्या मुलाच्या पसंतीला दाद दिली. खरतंर सातासमुद्रापलीकडची वेगळ्या धर्माची मुलगी एकुलत्या एक मुलगा निवडतो...तेव्हा हा धक्का एका मध्यवर्गीय कुटुंबासाठी आणि त्यांच्या गोतावळ्यासाठी मोठा असतो. इकडे पांचाळ फॅमिलीत मात्र रुसवे-फुगवे असं काही झालं नाही.

 कुठलेही आढेवेढे न घेता गुणवंत मुलाचा निर्णय योग्यच असेल हा विश्वास होता. तो पुढेही सार्थही झाला. चक्क प्रथमेशची आजीही नात सुनेला पहायला अमेरिकेत गेली होती. समंजस चेलसी आवडली आणि बायरन कुटुंबही भावलं. मग काय चार वर्षात छान संवाद झाला. मनं जुळली. आणि पुढे एकत्रही आली. भाषेची कुठलीचं अडचण नाही. प्रथमेश आई दीपाली यांचं इंग्रजी जेमतेमच...पण सासू-सुनेत कधी संवादाचा प्रॉब्लेम आला नाही. 
 


 समंजस आणि पटकून शिकून घेणा-या चालसीनं भारतीय संस्कृतीतल्या अनेक गोष्टी आत्मसात केल्यात. भारतीय जेवण असो वा वेशभूषा...अगदी दिवाळीतील लक्ष्मीपूजन असो इतर सण अगदी साडी नेसून तिनं उत्साहाने अनेक गोष्टी केल्या...आणि करत आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे जीवनभरचं बंधन... शुभमंगल सावधान...रेशीम गाठ 26 नोव्हेंबरला ठरली... हा लग्न सोहळा छान मराठमोळ्या संस्कृतीत पार पडला. चेलसीचा शालू असो की तिच्या आईची गोल साडी, वडील, भावाची धोती सगळे जण इथल्या भारतीय फ्लेवरमध्ये होते. वागणंही नम्र...हसतमुख...मुलीवाले म्हणून कुठला ताणतणाव नाही...अगदी आम्ही तुमच्यातलेच असा सहज वावर...लग्न ते कुलदेवता-देव दर्शन सगळीकडे आपल्या परंपरेत हे कुटुंब मिसळून गेलंय. एकत्र कुटुंबाचा अनुभव घेतलेल्या चेलसीला पांचाळ कुटुंबांनं मनोमन स्वीकारलयं. पैसोंकी बात नही...दिल बडा होना चाहीए...हेच खरं

विचार बदलतायेत...जग जवळ येतंय...

जाती-धर्माच्या भिंती गळून पडतायेत. मराठमोठ्या मध्यमवर्गीय कुटुंबातही परधर्मातील परदेशातली सून नांदतेय. आयुष्यभरासाठी दोन भिन्न संस्कृतीची कुटुंब आनंदानं...विश्वासानं एकत्र येतायेत. ही गोष्ट सासू-सुनेच्या मालिकांमध्ये रमणा-या आणि तसंच विश्व क्रिएट करणा-यांना जाग आणणारं आहे. या लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही पांचाळ पती-पत्नीच्या कानावर नेहमीचे संवाद पडत होते. 

'तुम्हाला कोकणात, मुंबईत काय उच्च शिक्षित खानदानी सून मिळाली नसती. आम्ही मागेल तेवढा हुंडाही दिला असता' असे संवादही ऐकणा-या प्रथमेशच्या आईनं म्हणजे सासूनं सून चेलसीला सुखी संसाराचा मंत्रही दिलाय. वरुन गाठी ठरतात...एकमेकांना समजून घ्या...हजारो किलोमीटरचं अतंर मिटून मनं जुळलेली ही कहाणी उत्तरोत्तर बहरत जाणार आहेत. कोकणातल्या निसर्गासारखी ताजी-टवटवीत राहणार आहे. न्यू यॉर्कमध्ये खूप मराठी मंडळी आहेत. प्रथमेश-चेलसी हे दाम्पत्य त्यांची मनं जिंकणार यात शंकाच नाही. आपल्याला एकच अपत्य असणार आणि त्याच्यावर उत्तम संस्कार करुन त्याला गुणवंत बनवायचा असा निर्धार पांचाळ दाम्पत्यानं केला होता. तो त्यांनी तडीसही नेला. असे अनेक आई-बाबा अवतीभोवती आहेत. त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगला रोडमॅप आहे.