हॅलोsss मी तुम्हांला गंडा घालणार आहे...

सर, मी सर्व्हिस प्रोव्हाडरकडून बोलते आहे. तुमच्या क्रेडीट कार्डवर आम्ही एक स्पेशल ऑफर देत आहे. त्यामुळे तुम्हाला सहा बेनिफिट मिळणार आहे. या सहा बेनिफिटची माहिती मी तुम्हांला देऊ शकते का..

Updated: Jun 10, 2015, 09:28 PM IST

प्रशांत जाधव, झी मीडिया, मुंबई


प्रशांत जाधव 

हॅलो, मी तुम्हांला गंडा घालणार आहे... असे सांगणारा कधी फोन येत नसतो... पण आलेल्या फोनवर आपल्या न कळत गंडा घातला जाऊ शकतो हे तुम्हांला माहित नसेल... असा गंडा 24taas.comच्या वाचकांना घालू नये यासाठी केलेला हा ब्लॉगाटोप... 

सर, मी सर्व्हिस प्रोव्हाडरकडून बोलते आहे. तुमच्या क्रेडीट कार्डवर आम्ही एक स्पेशल ऑफर देत आहे. त्यामुळे तुम्हाला सहा बेनिफिट मिळणार आहे. या सहा बेनिफिटची माहिती मी तुम्हांला देऊ शकते का...

सर, मी तुमच्या बँकेतून बोलते आहे. तुमचे एटीएम कार्ड डिअॅक्टिव्ह झाले आहे. ते पुन्हा अॅक्टीव्ह करण्यासाठी तुमच्या कार्डचा सोळा अंकाचा नंबर द्या... आणि कार्डच्या मागील तीन आकडी नंबर द्या आम्ही ते अॅक्टीव्ह करू....

ही दोन उदाहरणे.... ज्याने तुम्हाला मोठा गंडा घातला जाऊ शकतो. दोन दिवसांपूर्वी मलाही असाच एक फोन आला. तुमच्या क्रेडिट कार्डावर एक स्पेशल ऑफर आहे. तुम्हांला सहा बेनिफिट मिळणार आहेत. ते सहा बेनिफिट फक्त आणि फक्त तुम्हांलाच मिळत आहे. ( विशेष म्हणजे माझ्याकडे कोणतेही क्रेडिट कार्ड नाही)

यात एक मनी कार्ड, एक गिफ्ट व्हॉवचर, लाइफ टाइम मेंबरशीप, गिफ्ट, मनी बॅक कार्ड आणि भारतसोबत परदेशात प्रवासाची संधी यांचा समावेश आहे. असे या मुलीने सांगितले. सुमारे १२ मिनिटे ती हे फायदे मला सांगत होती. त्यानंतर तुम्हांला जर या ऑफर मान्य असतील तर मी तुमचा कॉल आमच्या ऑफिसरकडे ट्रान्सफर करते. दिल्लीवरून आलेला हा कॉल मी रेकॉर्ड करून घेत होतो. त्या मुलीने हा कॉल ट्रान्सफर न करता तो जवळच असलेल्या एका मुलाकडे दिला. त्यानंतर त्यानेही या सहा ऑफर मला एकानंतर एक पुन्हा सांगितल्या. त्यानंतर तो म्हणाला, तुम्हांला जी सहावी ऑफर आहे. त्यात तुम्हांला २ दिवस आणि तीन रात्रीचा मोफत स्टे भारतातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये मिळणार आहे. तसेच असा प्रवास तुम्ही परदेशातही करू शकतात. यासाठी तुम्हांला एकही पैसा द्यावा लागणार नाही.

मी म्हटले हो खरंच... हो सर, पण आम्ही तुमची निवड केली आहे. पण यासाठी काही सरकारी टॅक्स द्यावा लागतो. तो तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे आम्हांला कट करावा लागेल. मी म्हटले किती आहे आहे टॅक्स.... ते म्हणाले साधारण तुमच्या प्रवासाचे आणि राहण्याचा खर्च ६० हजार रुपयांच्या आसपास आहे. पण आम्ही तो खर्च घेणार नाही. पण यावर ६९९९ चा सरकारी टॅक्स लागतो. तो तुमच्याकडून घेतला जाणार आहे. तो तुम्ही आताच तुमच्या क्रेडिट कार्डावरून पे करू शकतात. मला जाणून घ्यायचे होते. की ही प्रक्रिया कशी चालते. त्यामुळे त्याचे बोलणे मी ऐकत होतो. आणि रेकॉर्डही करत होतो. मग त्याने सांगितले की माझा फोन झाल्यानंतर आमच्या एका अधिकाऱ्याचा तुम्हांला फोन येईल. तो फोन तुम्हांला तुमच्या क्रेडिट कार्डाचे डिटेल्स मागेल ते तुम्ही त्याला द्यायचे आणि मग तुम्हांला ही ऑफर मिळले. असे बोलून त्याने फोन ठेऊन दिला.


 

सुमारे ५ मिनिटानंतर ९१ ११ ४२६३३००१ या दिल्लीच्या त्याच क्रमांकावरून फोन आला. त्याने मला वरील सहा ऑफर पुन्हा सांगण्यास सुरूवात केली. मी त्या ऐकून घेण्यास नकार दिला. त्यांना सांगितले तुमचे काय म्हणणे आहे थोडक्यात सांगा. तो म्हणाला, आम्हांला सहा बेनिफीट सांगणे बंधनकारक आहे. त्याने पुन्हा वरील कॅसेट रिपीट केली. मग तो मूळ मुद्द्यावर त्याने मला आयव्हीआर मशीनवर तुमच्या डिटेल सांगण्यास लावले. आयव्हीआरवर जोडण्यापूर्वी त्याने मला मोबाईल कोणता वापरता. टच स्क्रिन आहे का की-पॅडचा मोबाईल आहे. माझा टच स्क्रिनचा मोबाईल आहे मी कि-पॅडचा सांगितला. त्याने माझा कॉल आयव्हीआरला ट्रान्सफर केला... मी लगेच तो कट केला.

फोन कट झाला म्हणून त्याने पुन्हा फोन केला. त्यावेळेस मी त्याला फैलावर घेतले. अशा प्रकारे कॉल करून तुम्ही सामान्यांना फसवतात. कोणत्याही सर्व्हीस प्रोव्हायरकडून डाटा मिळवून त्याद्वारे रॅन्डम कॉल करून लोकांना गंडवतात. मी पत्रकार असल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी समोरच्या माणसाचे धाबे दणाणले. त्याने सांगितले की सर तुमचा काही तरी गैरसमज होतोय. आमची ट्रॅव्हल टूर मॅनेज करणारी कंपनी आहे. त्याद्वारे आम्ही कस्टमरशी संपर्क करतो. कोणाला फसवत नाही.

मी तुमची सायबर सेलकडे तक्रार करतो. तुम्हांला खडी फोडायला लावतो असे दरडावले. त्यानंतर त्याची गाळण उडाली. त्याला काहीच बोलता येत नव्हते. त्याने लगेच माझा फोन कट केला. त्यानंतर मी पुन्हा त्या फोनवर कॉल केल्यावर तो लागतच नव्हता.

त्यानंतर, मी ऑफिसला आलो आणि घडलेला किस्सा सहकार्यासोबत शेअर केला. त्यावेळी अनेकांनी मला असा फोन असल्याचे सांगितले. त्यातील एकाने सांगितले की, दुपारी कॉल आला. त्यातील एका तरूणाने सांगितले की तुमचे एटीएम कार्ड डिअॅक्टीव झाले आहे. ते कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी आम्हांला तुमचा सोळा डिजीटचा कार्ड क्रमांक सांगा. त्यानंतर कार्डामागील तीन आकडी क्रमांक सांगा... असे म्हटल्यावर मित्राने त्याला उलट प्रश्न विचारले आणि सांगितले की मी ऑफीसला गेल्यावर आयसीआयसीआय बँकेला फोन करतो. असे म्हणून फोन ठेवला.

हे ऐकल्यानंतर मी थक्कच झालो. असे फोन करणाऱ्या दिल्लीच्या टोळ्या सक्रीय आहे. यावर कोणाचे अंकुश नाही की कोणाचे याकडे लक्ष नाही. कोणीही असा कॉल करून कोणालाही गंडा घालू शकतो, हे यावरून स्पष्ट होते. आपण न्यूज इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे वाचलो. पण सामान्यांचे काय होत असेल... 

त्यानंतर लगेच आमचे पिंपरीचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी एक बातमी पाठवली. ती पुढील प्रमाणे

सावधान! बँक खात्याची, एटीएमची माहिती विचारणाऱ्या कॉल्सना बळी पडू नका
 

फोनवर निनावी कॉल येऊन आपल्या बँक खात्याची माहिती विचारत असेल तर त्याला माहिती देऊ नका. हे आवाहन वारंवार बँकेकडून केलं जातं.. झी २४ तासनंही काही दिवसांपूर्वी असं एक प्रकरण दाखवलं होतं. तरीही अजून काही जण धडा शिकलेले नाहीत. अशा फोनकॉल्सना बळी पडलेत चक्क एक सीआयडी ऑफिसर, एक बँक मॅनेजर आणि काही टेक्नोसॅव्ही हे बिरूद मिरवणारे आयटी कर्मचारी... 

गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिकांना मी तुमच्या बँकेतून बोलतोय. तुमच्या खात्यातील पैसे आयकर खातं काढून घेईल अशी भिती दाखवली जात आहे. त्यातून त्यांचे खाते क्रमांक, एटीएम कार्डनंबर घेऊन त्यांना लुबाडल्याच्या घटना उघड होत आहेत. मात्र आता सर्वसामान्यांसोबत अशा कॉल्सवर विश्वास ठेऊन फसलेल्यांमध्ये मोठ्या पदावरचे अधिकारीही आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या एका सीआयडी ऑफिसरला, एका बँक मॅनेजरला आणि काही आयटी कर्मचाऱ्यांना अशा भामट्यांनी फसवत अक्षरशः लुबाडलंय. अर्थात ही मंडळी खूपच मोठ्या पदावरची असल्यामुळं त्यांनी बोलायला नकार दिलाय. पण अशा पद्धतीनं फसलेल्या एका वृद्धानं मात्र त्याच्याबाबत घडलेली हकीकत कॅमेऱ्यासमोर सांगितली.

फोन करणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला इतकी भीती घालते की फोन ऐकणारा त्यांच्या जाळ्यात अडकतोच. पण अशा भितीला जर पोलीस अधिकारी, बँक मॅनेजर, सो कॉल्ड टेक्नोसॅव्ही आयटी कर्मचारी बळी पडू लागले तर काय म्हणावं. असे कोणतेही कॉल्स बँकेतून केले जात नाही हे बँकांकडून वारंवार स्पष्ट केलं जातंय. 

असे फोन करून नागरिकांच्या खात्यातले पैसे काढून घेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत

 त्यामुळे तुम्ही सावधान रहा.. फोन करून कोणी तुमच्या खातेक्रमांक, एटीएम क्रमांक, पीन नंबर असं काहीही विचारलं तर अजिबात माहिती देऊ नका... ही माहिती दिलीत तर तुमच्या खात्यात काहीच शिल्लक राहणार नाही हे नक्की लक्षात ठेवा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.