अमित भिडे, मुंबई
जनतेला मूर्ख बनवणं खरंच एवढं सोपं असतं का? दोन घटना पाहिल्या तर माझं मत तरी तसंच झालंय. बाहुबली २ द कन्क्लुजन हा सिनेमा पाहून खरोखर पस्तावलो... भंपकपणा, खोटारडेपणाचा किळसवाणा कळस आहे हा सिनेमा.
बाहुबली १ खरोखर चांगला होता. बाहुबली वनमध्ये सुंदर कथानकाला भव्य ग्राफिक्स, युद्धक्षण यांची साथ लाभली. सुंदर गाणी, चांगला अभिनय याची साथ लाभली होती. बाहुबली १ संपला तेव्हा खरोखर चुटपूट लागली होती. थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षक भारावल्यासारखे झाले होते. याचा परिणाम म्हणून बाहुबली २ कडून महाप्रचंड अपेक्षा वाढल्या. त्याचा अपेक्षित परिणाम बॉक्स ऑफीसवर पाहायला मिळाला. पण बाहुबली २ ने माझीतरी सपशेल निराशा केली. अपेक्षाभंग केला...
कथानकापेक्षा भव्यता वरचढ करण्याच्या प्रयत्नात सिनेमा सपक व्हायला लागला... पहिल्याच्या तुलनेत सुमार दिग्दर्शन, सुमार अभिनय, सुमार गाणी झटपट गुंडाळण्यात आलेला शेवट यामुळे सिनेमा कंटाळवाणा झाला.. लार्जर दॅन लाईफ रंगवण्याच्या नादात काहीच्या काही अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग व्हायला लागले. त्यामुळे सिनेमा रटाळ व्हायला लागला...(दुसर्या सत्रात बाहुबली गावात राहायला जातो तेव्हा मैने प्यार कियामधल्या दगडखाणीत काम करणाऱ्या सलमान खानची आठवण झाली.)
माझा आक्षेप सिनेमा चांगला वाईट हा नाहीच आहे. माझा आक्षेप आहे या सुमारांच्या मार्केटींग हाईपला बळी पडून करून घेतलेल्या आर्थिक लुटीला... सिनेमाची भरभक्कम तिकीटं, मध्यंतरातले वाढीव दरातले पॉपकॉर्न, जायचा यायचा खर्च धरला तर दोनेक हजार रूपये खर्च झाले. मी या मुर्खपणाला का बळी पडलो याचा संताप होतोय.
दुसरा मुर्खपणा जस्टीन बिबर या प्राण्याचा. या जस्टीन बिबरचा कार्यक्रम असाच प्रचंड हाईप झालेला. ७६ हजार रूपयांचं तिकीट होतं या गाढवाच्या कार्यक्रमाला... मुली ब्रा काय काढून फेकतात. याला लहान म्हटलं म्हणून हा याचं गुप्तांग बाहेर काय काढून दाखवतो असले अचाट पुचाट किस्से पसरवून या चोराची हाईप झाली. भारतीय पब्लिकने हप्ते भरूनही तिकीटं काढून गर्दी केली.. आमचे सलमान शाहरूख म्हणे याच्यासाठी पायघड्या घालून होते. जॅकलिन फर्नांडीस म्हणे याचं आदरातिथ्य करणार होती... एवढी नाटकं झाल्यावर हा कार्यक्रम झाला आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात या भंपक माणसाने म्युझिक ट्रॅकवर ओठ हलवले म्हणे...
आपल्याला नेमकं झालंय काय... कोणीही येतोय आणि खिशावर डल्ला मारून जातोय. खरंच आपल्याला मूर्ख बनवणं एवढं सोपे झालंय का?