प्रभूंना आली जाग... कॅशलेस मिळाला पास...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर कॅशलेस जाणाऱ्या सर्वात शेवटच्या खात्यापैकी एक असलेल्या रेल्वे खात्याला आता जाग आली असून प्रभूंची रेल्वेने आता सिझन पास कॅशलेस देण्याची व्यवस्था केली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 10, 2017, 08:56 PM IST
 प्रभूंना आली जाग... कॅशलेस मिळाला पास... title=

प्रशांत जाधव, संपादक, 24taas.com,मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर कॅशलेस जाणाऱ्या सर्वात शेवटच्या खात्यापैकी एक असलेल्या रेल्वे खात्याला आता जाग आली असून प्रभूंची रेल्वेने आता सिझन पास कॅशलेस देण्याची व्यवस्था केली आहे. 

झी २४ तासने ५ डिसेंबर रोजी मोदींच्या कॅशलेसच्या आवाहनानंतर रिअॅलिटी चेक करण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या विविध स्टेशनच्या तिकीट काउंटरला भेट दिली. त्या ठिकाणी सिझन पास कॅशलेस मिळेल का याची विचारणा केली. पण एकाही ठिकाणी पास कॅशलेस मिळत नव्हता. पैशाची टंचाई असताना पास हा रोखीने घ्यावा लागत होता. ही परिस्थिती झी २४ तासने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे मंत्रालय यांना ट्विट करून कळवली होती. 

त्यानंतर काही दिवसात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मुंबईच्या उपनगरीय वाहतूकीचा सिझन पास डेबीट किंवा क्रेडीट कार्डाने काढल्यास ०.५ टक्के सूट मिळेल असे घोषीत केले. तरीही डेबीट कार्ड स्वॅप मशीन रेल्वेच्या प्रत्येक तिकीट घरात आले नव्हते. 

हुश्श स्वॅप मशिन आले..

मुंबईत लोकलमध्ये सुमारे ६० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यातील बहुतांशी प्रवासी हा मासिक पास काढतात. त्यांना आता स्टेशनच्या काही काउंटरवर स्वॅप मशिनने मासिक, त्रैमासिक किवा सहामाही पास काढता येणार आहे. यासाठी त्यांना ०.५ टक्के सूटही मिळत आहे. 

मला मिळाला कॅशलेस पास....

रेल्वेला कॅशलेस व्हायला जानेवारी उजाडला.. माझा सहा जानेवारी रोजी पास संपणार होता. मी ५ जानेवारी रोजी एल्फिस्टन रोडच्या तिकीट खिडकीवर कॅशलेस कार्ड स्वॅप मशीनची विचारणा केली. पण त्यात ठिकाणी स्वॅप मशीन नव्हते. त्यांनी दुसऱ्या तिकीट घराकडे जाण्यास सांगितले. 

७ आणि ८ जानेवारी सुट्टी असल्याने मी ९ जानेवारीला पास काढण्यासाठी डोंबिवलीच्या तिकीट घराजवळ गेलो. कार्ड चालेल का विचारले, काचेच्या खिडकी बाजुला असलेल्या वयस्क महिलेने मला हो असे उत्तर दिले.... माझा आनंद गगनात मावत नव्हता.  मी तात्काळ माझे कार्ड काढले आणि स्वॅप करायला दिले.  तिकीट खिडकीवरील वयस्क महिलेला ही सिस्टिम नवीन होती त्यामुळे तिने जरा वेळ लावला. पण मला पास कॅशलेस मिळत होता त्यामुळे मला याचं काही वाटलं नाही. 

मिळाली सूट

मी दरवेळी तीन महिन्यांचा फर्स्ट क्लासचा पास काढतो. डोंबिवली ते भायखळा याचे तीन महिन्यासाठी मला २४६० रुपये द्यावे लागायचे. दरम्यान ऑनलाइन पास काढल्यावर मला २४५० रुपये म्हणजे १० रुपयांची सूट मिळाली.